'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...'

Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2024, 04:54 PM IST
'भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा...', अमृता फडणवीसांनी करुन दिली आठवण; 'पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस...' title=

Amruta Fadnavis on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी देवेंद्रजी म्हणाल्याप्रमाणे पुन्हा आले आहेत, ते जे काही करतील त्यांच्या पाठीशी आम्ही असून असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

"देवेंद्रजी सहाव्यांदा आमदार आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. ही खूप आनंदाची आणि जबाबदारीची बाब आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आहे याचा आनंद आहे. महायुती आता एकत्रित आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी वाटचाल आजपासून सुरु केली याचा आनंद आहे," असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्षाच्या काळाबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "त्यांचं जीवनच एक संघर्ष राहिला आहे. मी त्यांना जवळून पाहिलं आहे. त्यांच्यात जिद्द आहे. एकदा ठरवलं की ते करुन दाखवतात. चिकाटी, संयमामुळे ते आज येथे आहेत". आज फार सुंदj दिवस आहे. महाराष्ट्रासाठी त्यांना खूप काम करायचं आहे. यामुळे ही फार मोठी जबाबदारी आहे असंही त्यांनी सांगितलं. 

देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे आले याबाबत विचारलं असता त्यांनी म्हटलं की, "जेव्हा आपल्याला काहीतरी मिळवायचं असतं तेव्हा अर्जुनाप्रमाणे फक्त लक्ष्य पाहायचं असतं. ती गादी नव्हे तर लोकांना ते महाराष्ट्रासाठी जे काही करु शकतील ते इतर कोणी करु शकणार नाही याचा विश्वास होता यामुळे पुन्हा येईन म्हणाले होते". 

"त्यांनी आपल्या कामाचं चीज करुन दाखवलं आहे. कोणतंही पद मिळालं असतं तर त्याचंही चीज केलं असतं. कोणत्याही पदावर असते तर त्यांनी लोकसेवाच केली असती," असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. ते पहिला निर्णय लोकहिताचा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मी जेव्हा प्रचार करत होती, तेव्हा मला स्त्रिया प्रेमाने पाठीशी उभ्या अशल्याचं जाणवत होतं. लोकांनी साथ दिल्याचा आनंद आहे अशाही भावना त्यांनी मांडल्या. 

जेव्हा भाजपासोबत धोका झाला होता तेव्हा मी एक ट्विट केलं होतं. त्याच्या ओळी त्यांनी बोलून दाखवत आज मौसम बदलला आहे असं म्हटलं. आज फार आनंद आहे. देवेंद्रजी तुम्ही पुन्हा आले आहात. जे काही काम कराल त्यासाठी आम्ही पाठीशी असू असंही त्यांनी सांगितलं.