Anand Mahindra On Best Bus: बेस्टची आयकॉनिक डबल डेकर (Double Decker Bus) बस आता इतिहासजमा झाली आहे. 15 सप्टेंबरला बेस्ट बसने मुंबईकरांचा कायमचा निरोप घेतला आहे. या बेस्ट बससोबत मुंबईकरांच्या अनेक आठवणी आहेत. बसच्या निरोपाच्या क्षणीही अनेक मुंबईकर अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियासमोर जमले होते. केककापून मुंबईकरांनी आयकॉनिक डबल डेकर बसला निरोप दिला. आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनीही बेस्ट बसच्या निरोपाचा एक फोटो शेअर करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. आनंद महिंद्राच्या या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनीही मन भावूक करणारा रिप्लाय दिला आहे. (Anand Mahindra On Mumbai Police)
बेस्ट बसला अखेरचा निरोप देण्यासाठी शेकडो प्रवासी पोहोचले होते. आनंद महिंद्रा यांनीही हाच धागा पकडत एक ट्विट केले आहे. मुंबई पोलिसांना टॅग करत त्यांनी म्हटलं आहे की, हॅलो मुंबई पोलिस, मी माझ्या बालपणीच्या सगळ्यात प्रिय आणि महत्त्वाच्या आठवणीतील एक आठवण चोरी झाल्याची तक्रार करु इच्छितो. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय केले आहे. काही युजर्सने डबल-डेकर बससंबधीत त्यांच्या आठवणीदेखील महिंद्रांसोबत शेअर केला आहे.
Hello, Mumbai Police? I’d like to report the theft of one of my most important childhood memories. https://t.co/Lo9QHJBVDW
— anand mahindra (@anandmahindra) September 15, 2023
आनंद महिंद्रा यांनी ज्या पद्धतीने ट्विट शेअर केले आहे. त्यावरुन मुंबई पोलिसांनीही त्यांना उत्तर दिलं आहे. मुंबई पोलिसांनीही महिंद्रा यांच्या ट्विटवर रिप्लाय केला आहे. आम्हाला आनंद महिंद्रा सरांकडून एक नॉस्टॅल्जिक चोरीची तक्रार मिळाली आहे. आम्ही चोरी झाल्याचे स्पष्टपणे पाहू शकतोय. मात्र आम्ही ती ताब्यात घेऊ शकत नाही. त्या सुंदर आठवणी तुमच्या व सगळ्या मुंबईकरांच्या दृदयात सुरक्षितरित्या कैद करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांचा रिप्लाय वाचून आनंद महिंद्राही थक्क झाले आहेत. त्यांनीही त्यावर रिप्लाय करत तुम्ही खूपच ग्रेट आहात, असं म्हटलं आहे.
We’ve received a 'nostalgic heist' report from @anandmahindra Sir!
We can clearly see the theft, but we cannot take possession of it. Those B.E.S.T cherished memories are safely kept in your heart, and among all Mumbaikars.#DoubleDecker #MumbaiMemories #BestMemories https://t.co/32L2nmzXiQ
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) September 15, 2023
दरम्यान, मुंबई डबल डेकर बस इतिहास जमा झाल्याने मुंबईकरांची 86 वर्षांची साथ सुटणार आहे. डबल डेकर बस ही ब्रिटिशांनी भारतात आणली होती. 1937 मध्ये डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या. ओपन डबल डेकर बस 1997 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुरू केल्या होत्या. 90 च्या दशकानंतर बसेस जुन्या होऊ लागल्याने त्यांची संख्या कमी होऊ लागली. बेस्टच्या डबल डेकर बसची जागा आता एसी डबल डेकर बसेस घेणार आहेत. इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या या बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केली होती.