Rada in Harsul village : छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक बातमी. हर्सुल भागातल्या ओव्हर गावामध्येही दोन गटांच्या वादात तुफान दगडफेक झाली आहे. ओव्हर गावातल्या रस्त्यांवर दगडांचा खच पडला असून दगडफेकीत 6 जण जखमी झालेत. किरकोळ भांडणातून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सुरुवातीला महिलांमध्ये जोरदार भांडणं झाली. त्यानंतर पुरुषही जमले आणि तुफान दगडफेक सुरु झाली. परिसरात आता पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन प्रशासनानं केलंय. तर दोन गटांमध्ये झालेला हा वाद होता. याचा काहीही धार्मिक वादाशी संबंध नसल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.
संभाजीनगरच्या हर्सूल भागातील ओव्हर गावात झालेला किरकोळ वाद होता. दोन गटांमध्ये झालेला हा वाद आहे. याचा काहीही धार्मिक वादाशी संबंध नाही, असा खुलासा पोलीस उपायुक्त शिलवंत नांदेडकर यांनी केला आहे. या गावात दगडफेक झाली असल्याचे सांगत यात सहा लोक किरकोळ जखमी झाले आहे. मात्र आता गावात शांतता असल्याचं त्यांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री किराडपुरा भागात दंगल केल्याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केलीय. तर चार संशयित आरोपींसह सुमारे 400 ते 500 अज्ञातांविरोधात 18 कलमांअंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आहेत. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत संशयितांची धरपकड़ सुरू केली होती. सगळ्याच आरोपींचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. समाजकंटकांनी एकूण 18 गाड्या जाळल्यात. यात पोलिसांच्या 15 तर खासगी 3 गाड्यांचा समावेश आहे.. जाळपोळीत 3 कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे तर दगडफेकीत 16 पोलीस जखमी झाले आहेत.