शिर्डी-पाथरी वादात आणखी एका गावाची उडी, साईंच्या जन्मस्थळावर केला दावा

जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी वादात आता प्रकटभूमीचा वाद

Updated: Jan 21, 2020, 12:09 PM IST
शिर्डी-पाथरी वादात आणखी एका गावाची उडी, साईंच्या जन्मस्थळावर केला दावा  title=

औरंगाबाद : साईंच्या जन्मस्थळावरून शिर्डी आणि पाथरीत वाद सुरू असताना आता आणखी एका गावानं या वादात उडी घेतली आहे. सर्वात आधी साईबाबा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या धुपखेडा गावात अवतरल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. या घटनेचा साईचरित्रातही उल्लेख आहे. त्यामुळे धुपखेड्याला विकास निधी का नाही असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी ग्रामसभाही घेण्यात आली.

साईबाबांनी त्यांच्या आयुष्यातले सुरुवातीचे काही वर्ष याच गावात वास्तव्य केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून साईंच्या जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी वाद सुरू असताना आता साईंच्या प्रकटभूमीचा वाद पुढं आला आहे.

महाराष्ट्रात सध्या साईंच्या जन्मस्थानावरुन शिर्डी आणि पाथरी या दोन गावांकडून दावा होत असताना आता आणखी एका गावानं यावर दावा केला आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी आणखीन वाढणार आहेत. कारण या गावाने देखील निधीची मागणी केली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यानंतर बैठक घेत हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला. पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा असं नाव दिलेल्या आराखड्यातून साई जन्मस्थळ हा उल्लेख काढून टाकण्याचं मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांबरोबरच्या बैठकीत मान्य केलं. पाथरीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्र्यांनी 100 कोटी रुपये जाहीर केले होते. त्या विकास आराखड्याच्या नावात साई जन्मस्थळ असा उल्लेख केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. 

साईबाबांनी कधीच जन्मस्थळाचा उल्लेख केला नव्हता, त्यामुळे तो उल्लेख काढून टाकावा, अशी मागणी करत शिर्डीकर संतप्त झाले. शिर्डीत याविरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिर्डीकरांची बैठक बोलावली होती. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडेंसह शिर्डीकर उपस्थित होते. पण २ गावांना वाद संपत नाही त्यात आता तिसऱ्या गावाने दावा केल्याने वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.