पुणे : 500 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मुकादमाच्या घरात 36 लाखांची रोकड आणि दहा तोळे सोनं सापडलंय. एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या घरात मिळालेल्या या घबाडामुळं सारेच चक्रावून गेलेत.
या सफारीवाल्याच्या घरात हे सगळं घबाड सापडलं आहे. सुनील रामप्रकाश शर्मा असं या लाचखोराचं नाव असून तो लोहगावातल्या संजय पार्क मध्ये राहतो.
महापालिकेच्या वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयात शर्मा मुकादम म्हणून काम करतो. रस्त्याच्या कडेला नारळ विकून पोट भरणाऱ्या महिलेकडून तो हप्ता वसुली करायचा. अखेर त्या महिलेनं अँटी करप्शन ब्युरोकडे शर्माविरोधात तक्रार दिली.
महिलेप्रमाणे परिसरातील शेकडो व्यावसायिक शर्माला वैतागले होते. इतर कोणी समोर आलं नाही, मात्र या महिलेने शर्मा विरोधात तक्रार देण्याचं धाडस दाखवलं.
या तक्रारीची दखल घेत शर्माला सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आलं. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी संपत्ती आढळून आली.
३६ लाख कॅश
१०० ग्रॅम वजनाची सोन्याची ७ वळी
पाच लाखांचा बँक बॅलन्स
२ लाखांची बचत पत्रं
१० एकर जमीन खरेदीची कागदपत्रं
पुणे महापालिकेच्या एका प्रभागात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची ही मजल. केवळ त्याच्या भागातील हप्ते वसुलीचा विचार केला तरी त्यांने आजवर किती माया जमवली असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी.