नवी दिल्ली : Arjun Khotkar and Raosaheb Danve together : महाराष्ट्रातील राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे. कट्टर हार्डवैरी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे ब्रेकफास्टला एकत्र आले आहेत. रावसाहेब दानवे यांच्या घरी अर्जुन खोतकर दाखल झालेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या भेटीनंतर खोतकर दानवे यांच्या भेटीला पोहोचलेत.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. महाराष्ट्रात सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यातही ते अपयशी ठरताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र विधानसभेतील उपनेते अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. आज त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या घरी ब्रेकफास्टला हजेरीही लावली आहे.
अर्जुन खोतकर यांचा जालना जिल्ह्यात चांगला प्रभाव मानला जातो. खोतकर यांच्या एकनाथ शिंदे यांच्या भेटीला केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे हेही उपस्थित होते. या भेटीनंतर अर्जुन खोतकर लवकरच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या छावणीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या भेटीची चर्चाही जोरात सुरु आहे, कारण अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी मी आयुष्यभर शिवसेनेतच राहणार असल्याचे सांगितले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही उपनेतेपदाची जबाबदारी खोतकर यांच्याकडे सोपवली होती.पण खोतकर यांनी सोमवारी थेट दिल्ली गाठून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात एकनाथ शिंदे यांनी समझोता केल्याचे मानले जात आहे. दोन्ही नेते जालन्यातील रहिवासी असून 2019 मध्ये त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी दोन्ही नेत्यांमध्ये मध्यस्थी करुन वाद मिटवला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर अर्जुन खोतकर यांना कोण पाठिंबा देणार हा प्रश्न आहे.
शिंदे यांना पाठिंबा दिल्यास त्यांच्या रावसाहेब दानवे यांच्या लढ्याचे काय होणार, असा प्रश्न खोतकरांसमोर निर्माण झाला आहे. दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यात शिंदे यांना यश आल्याचे बोलले जात आहे. मात्र खोतकर हे गेल्या काही काळापासून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) निशाण्यावर आहेत. अशा स्थितीत तपास टाळण्यासाठी ते उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गोटात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. दरम्यान, खुद्द अर्जुन खोतकर यांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नसले तरी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत भेटल्याने ते काहीतरी मोठा विचार करत असल्याचे स्पष्ट होत आहे.