Ashadhi Ekadashi 2023 : विठ्ठलाच्या भेटीसाठी वारकऱ्यांच्या सोबत पंढरीला प्रस्थान ठेवण्याचं वेध लागलेल्या पालखी सोहळ्याला सुरूवात झाली आहे. आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यातील श्रींचा वैभवी रथ ओढणाऱ्या बैलजोडीचा यावर्षी तुळशीराम भोसले तसंच रोहित भोसले यांना मान मिळाला आहे.
तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांनी रथ ओढण्यासाठी आणलेल्या बैलजोडीची आळंदीमध्ये भोसले निवास स्थानापासून श्री भैरवनाथ मंदिर, नगरप्रदक्षिणा मार्गे माऊली मंदिर अशी भव्य मिरवणूक हरिनाम जयघोषात झाली. यावेळी ग्रामस्थी अगदी उत्साहाच्या भरात या बैलजोडीची पुजा केली.
श्रींचा वैभवी पालखी सोहळा आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे याठिकाणी तयारीला वेग आल्याचं दिसून येतंय. यावेळी भव्य मिरवणूक, फटाक्यांचे आतिषबाजी जल्लोषात झाली. आळंदी देवस्थानचे बैल समितीने दिलेल्या मंजुरी प्रमाणे इथल्या ग्रामस्थ तुळशीराम भोसले आणि रोहित भोसले यांनी श्रींचे सोहळ्याचे वैभव वाढविण्यासाठी रथाची बैलजोडी लक्षवेधी खरेदी करून श्रींचे पालखी सोहळ्यातील सेवेसाठी आणली.
श्री भैरवनाथ महाराज मंदिराचे पुजारी भाऊ वाघमारे यांनी बैलजोडीची पूजा केली. अगदी उत्साहाच्या भरात बैलजोडीची आळंदीत भव्य मिरवणूक वाजत गाजत तसंच हरिनाम जयघोषात झाली. याचं दर्शन घेण्यासाठी भाविक आमि नागरिकांनी मोठी गर्दी केली.
माऊलींचे मंदिर महाद्वारात ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे बैलजोडीची पूजा करण्यात आली. यावेळी पालखी सोहळा प्रमुख विधीतज्ञ विकास ढगे पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, तुकाराम माने, सोमनाथ लवंगे, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, विलास घुंडरे, रोहित भोसले, विष्णू वाघमारे, श्रींचे मानकरी योगिराज कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली घुंडरे पाटील, ज्ञानेश्वर दिघे, ज्ञानेश्वर गुळुंजकर, पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरूड इत्यादी उपस्थित होते.