हत्या करुन खाडीत फेकलेल्या आईचा मृतदेह शोधून द्या, मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

 अश्विनी बिद्रेच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालणारे पत्र लिहिले

Updated: Feb 18, 2020, 09:11 AM IST
हत्या करुन खाडीत फेकलेल्या आईचा मृतदेह शोधून द्या, मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

मुंबई : पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांची हत्या करुन हा मृतदेह वसईच्या खाडीत फेकण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. दरम्यान अश्विनी बिद्रेच्या मुलीने मुख्यमंत्र्यांना भावनिक साद घालणारे पत्र लिहिले आहे. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने माझ्या आईची हत्या केली आणि मृतदेह वसईच्या खाडीत टाकला. तो मला शोधून द्या असे तिने या पत्रात म्हटले आहे. यासंदर्भात बोलण्यासाठी मला आणि वडीलांना तुमची वेळ द्या असे देखील  म्हणाले. त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय उत्तर देणार ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सुची गोरे असे अश्विनी बिद्रेंच्या मुलीचे नाव आहे.

हातकणंगलेतल्या शाळेत सुची ही इयत्ता पाचवीमध्ये शिकत आहे. सहा वर्षांची असताना आईचा खून करुन मृतदेह वसईच्या खाडीत फेकला. तेव्हा पैसे नसल्याचे कारण देत हा मृतदेह शोधण्याचे काम थांबवण्यात आले होते. मला आईचा मृतदेह शोधून द्या असे सुचीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

आईला मारले तसे पोलीस माझ्या बाबांना देखील मारतील अशी मला भीती वाटत असल्याचे सुची म्हणाली. खुन्याला शिक्षा मिळावी यासाठी बाबा न्यायालयाच्या फेऱ्या मारत आहेत. न्यायालयाच्या फेऱ्यात बाबा हरवले आहेत. मी आई गमावली आहे..आता मला बाबांना गमवायचे नसल्याचे सुचीने पत्रात म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे ज्या ११ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातलं आळते हे अश्विनी बिद्रे यांचं मूळ गाव. २००० सालापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या अश्विनी यांची २००६ साली पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली. त्यापूर्वी २००५ साली त्यांचा राजू गोरे यांच्याशी विवाह झाला. 

पोलीस दलात रुजू झाल्यानंतर अश्विनी बिद्रे यांचं पोस्टिंग पुणे आणि नंतर सांगलीत झालं. सांगलीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी त्यांचा परिचय झाला आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. बिद्रे यांना एक मुलगी असतानाही त्यांचं प्रेम प्रकरण सुरुच होतं. 

२०१३ साली रत्नागिरीत सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी रुजू झाल्यानंतरही बिद्रे यांच्याकडे कुरुंदकर याचं जाणयेणं होतं. 

या सर्व प्रकारामुळे राजू गोरे आणि कुटुंबीयही व्यथित होते. यातूनच कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात सतत वाद होत होते. अश्विनी यांना गायब करण्याच्या धमक्याही कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांच्या पतीला दिल्या होत्या. 

याच काळात २०१६ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली, मात्र त्या कामावर रुजू झाल्याच नाहीत. ११ एप्रिल २०१६ या दिवशी अश्विनी बेपत्ता झाल्या. १४ एप्रिल २०१६ या दिवशी त्यांच्या मोबाईवरुन विपश्यनेला जात असल्यानं आपल्याला सहा महिने शोधू नये, अशा स्वरुपाचा मेसेज कुटुंबीयांना मिळाला. त्यानंतर तो मोबाईल ट्रेस होऊ शकलाच नाही. 

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अश्विनी यांनी १७, १८ आणि १९ एप्रिल २०१६ रोजी कोल्हापूरला जाण्यासाठी सुट्टी मिळावी असा अर्ज वरिष्ठांना केला होता. यातून संशय आणखीनच बळावला. दरम्यान त्या सेवेवर हजर झाल्या नसल्याचं पत्र पोलीस खात्यानं अश्विनी बिद्रे कुटुंबीयांना पाठवलं. 

चार महिने वाट पाहूनही अश्विनी परत न आल्यानं त्यांचे कुटुंबीय धास्तावले. याच काळात अश्विनी यांच्या लॅपटॉपमध्ये अभय कुरुंदकर याच्याशी प्रेमाचे, तसंच मारहाणीचे सर्व संवाद आणि व्हिडिओ कुटुंबीयांच्या हाती लागले.

त्यानंतर १४ जुलै २०१६ रोजी घरच्यांनी याप्रकरणी नवी मुंबईतल्या कळंबोली पोलिसांत सर्व पुराव्यांनिशी तक्रार दाखल केली. मात्र त्यानंतरही अभय कुरुंदकरवर कारवाई झाली नाहीच, उलट कुरुंदकर तातडीनं रजेवर गेला.