दीपक भातुसे, झी मीडिया, लातूर : मागील 15 वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय. अचानक हा मतदारसंघ शिवसेनाला का आणि कसा सोडला ? असा प्रश्न रमेश कराड यांनी उपस्थित केला आहे. गोपीनाथ मुंडे यांचा रेणापूर तालुका ज्या लातूर ग्रामीण मतदारसंघात येतो तो मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. 2014 च्या निवडणुकीत सर्व पक्ष वेगळे लढले तेव्हा लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसला एक लाखाच्या घरात, तर भाजपाच्या रमेश कराड यांना ९१ हजार मतं मिळाली होती. तेव्हा शिवसेनेला केवळ अडीच हजार मतं मिळाली होती. पक्षाने मला यावेळीही सांगितले होते तुम्हाला इथून निवडणूक लढवायची आहे. दरम्यान काहीना काही घडलंय अशी शंका त्यांनी उपस्थित केली. याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे तसेच दोन-तीन कार्यकर्त्यांना हार्ट अटॅक आले असून ते रुग्णालयात असल्याचे ते म्हणाले.
या मतदारसंघात शिवसेनेचा एकही ग्रामपंचायत सदस्य नाही, तर भाजपाकडे नगरपालिका, अनेक जिल्हा परिषद सदस्य, अनेक ग्रामपंचायती आहेत. असं असतानाही हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने कार्यकर्त्यांबरोबरच रमेश कराडही नाराज आहेत. पक्षाच्या विनंती नंतर त्यांनी अपक्ष म्हणून भरलेला अर्ज मागे घेतलाय. मात्र तरीही गोपीनाथ मुंडेंचा हा मतदारसंघ भाजपाने का सोडला ? हा प्रश्न त्यांना सतावतोय. यात काही ना काही घडलंय अशी शंका कराड यांनी 'झी 24 तास'शी बोलताना व्यक्त केलीय.
मला उमेदवारी मिळाली नाही पण लोकांचे प्रेम तर कुणी हिरावून घेऊ शकत नाही. ज्यांनी कुणी हा डाव रचला ते जनतेला माहीत आहे. माझ्या जनतेन मला त्यांच्या मनातला आमदार मानला आहे. 24 तारखेला मतदान आहे तेव्हाच काय ते समजेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.