डान्सबार मालकांची नशा उतरविणाऱ्या राहुल गेठेंना फडणवीस-शिंदे सरकारकडून ‘गिफ्ट’

Dr Rahul Gethe:  नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठेंना नव्या सरकारमध्ये मोठे गिफ्ट मिळाले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 16, 2024, 05:50 PM IST
डान्सबार मालकांची नशा उतरविणाऱ्या राहुल गेठेंना फडणवीस-शिंदे सरकारकडून ‘गिफ्ट’ title=
राहुल गेठे

ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील असे उपायुक्त ज्यांनी आपल्या कामामुळे ओळख मिळवली. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर डान्सबार चालविणाऱ्या बारमालकांना एका रात्रीत सरळ केले. बारच्या इमारतींवरच थेट बुलडोजर फिरवले. असे नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठेंना नव्या सरकारमध्ये मोठे गिफ्ट मिळाले आहे. 

माजी मुख्यमंत्री आणि आताच्या घडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'ओएसडी' असलेल्या डॉ. राहुल गेठे हे आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. अतिक्रमणांवर बेधडक कारवाई करून आधी शिंदे सरकारमध्ये दरारा वाढवलेल्या डॉ. गेठेंच्या प्रमोशनमुळे डान्सबारमालकांना नक्कीच धडकी भरणार आहे.

 शहरातील अतिक्रमणांना टार्गेट

ठाकरेंचे आमदार फोडून, त्यांना सुरत, गुवाहाटी आणि गोव्याला नेण्याच्या स्पेशल ऑपरेशनपासून डॉ. गेठे हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले. पुढे शिंदे 'सीएम' होताच डॉ. गेठे हे त्यांचे 'ओएसडी' झाले. तेव्हाच, डॉ. गेठेंनी 'सीएमओ'त आपली छाप पाडली आणि शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांसोबत संबंध वाढवले. या सरकारच्या काळात घडलेल्या चांगल्या-वाईट घडामोडीत डॉ. गेठेंनी आपली कामगिरी ठळक केली. त्यामुळेच 'सीएमओ' म्हणजे, डॉ. गेठे हे समीकरण दिसून आले. याच काळात सीएमओपाठोपाठ डॉ. गेठे यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या पदावर बसतानाच डॉ. गेठेंनी शहरातील अतिक्रमणांना टार्गेट केले आणि ती जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला. 

 पुन्हा बारमालकांची नशा उतरणार

पुण्यात पोर्श प्रकरण घडताच बेकायदा विशेषतः अमली पदार्थ, डान्सबार आणि रात्री-अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पवित्रा घेत, शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. याचा फायदा उठवून डॉ. गेठेंनी नवी मुंबई महापालिकेतील बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून, डॉ. गेठेंच्या वर्किंग स्टाइलवर बोट ठेवले. त्यानंतर आपल्या पध्दतीने कारवाई सुरू ठेवून डॉ. गेठेंनी बारमालकांना धडा शिकवला. हेच गेठे आता नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त झाले आहेत. डॉ. गेठेंच्या या प्रमोशनमुळे आता पुन्हा बारमालकांची नशा उतरणार, हे नक्की.