पुणे : पुण्याचे कारभारी लवकरच बदलणार असं दिसतंय. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरुडमधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने चंद्रकांत पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णींचा कोथरुडमधून पत्ता कापला गेलाय. चंद्रकांतदादांकडे पुण्याची पाटीलकी सोपवली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रकांतदादा पाटील पुण्याचे कारभारी होण्याची जोरदार तयारी करतायत. तमाम आव्हानं चंद्रकांत पाटलांनी स्वीकारली आहे. चंद्रकांत पाटील पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून निवडून लढणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. दरम्यान मेधा कुलकर्णी यांनी या मतदार संघातून जोरदार तयारी केली होती. त्यामुळे चंद्रकांत पाटलांना उमेदवारी जाहीर करताना मेधा कुलकर्णींचे डोळे पाणावले होते. पण त्यांची नाराजी दूर करण्यास पक्षाला यश आले आहे.
कोथरूड भाजपासाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे
२०१४ च्या विधानसभेत मेधा कुलकर्णी सुमारे ६४ हजारांच्या मताधिक्यानं विजयी झाल्या होत्या
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या गिरीश बापटांना या मतदारसंघातून लाखाहून अधिक मताधिक्य मिळालं होतं
या मतदारसंघात उमेदवारीसाठी विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपाचे नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्यात कमालीची चुरस होती
चंद्रकांत पाटलांचं नाव कोल्हापूर उत्तर मधून चर्चेत होतं. मात्र तिथं शिवसेना जागा सोडायला तयार नाही
एकूण पश्चिम महाराष्ट्राचा व्याप आणि भाजपच्या दृष्टीनं धोक्यात असलेले मतदारसंघ विचारात घेता निवडणूक समन्वयाच्या दृष्टीनं पुणे हे केंद्रस्थानी आहे.
चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असले तरी पुण्याचे पालकमंत्रीही आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसंच विद्यार्थी परिषदेची पार्श्वभूमी असल्यानं बहुजन समाजातले असूनही ते पुण्याचा सर्वमान्य चेहरा ठरू शकतात.
2014 मध्ये पुण्यातून भाजपाचे ८ पैकी ८ आमदार निवडून आले होते.. पण पाच वर्षांनंतर तीच मोडस ऑपरेंडी चालणार नाही.... पुण्याचा विस्तार झाल्यानं पुण्यातले डेमोग्राफिक्स बदललेत,
गेल्या काही दिवसांतल्या पवार गेममुळेही मतं बदलण्याची शक्यता आहे.... म्हणूनच भाजपा मराठा कार्ड खेळतेय की काय ?, अशीही चर्चा आहे
तर एकूण काय तर अजित दादा, गिरीश भाऊ यांच्यानंतर चंद्रकांत दादा खऱ्या अर्थानं पुण्याचे कारभारी होऊ घातलेत.