मतमोजणीच्या दिवशी दारूविक्रीस परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

वाईन मर्चंट असोसिएशनमध्ये याचिका दाखल केली होती 

Updated: Oct 20, 2019, 12:49 PM IST
मतमोजणीच्या दिवशी दारूविक्रीस परवानगी, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय title=

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या मतदान सोमवारी 21 ऑक्टोबर 2019 रोजी होणार आहे. राज्यातील 288 जागांसाठी हे मतदान होणार आहे. गुरूवारी 24 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे. या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने संध्याकाळी 6 वाजल्यापासून मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. 

न्यायाधीश उज्वल भूयान यांनी मद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. न्यायाधीश भुयान यांनी शुक्रवारी 1951 साली लागू केलेला लोकप्रतिनिधी कायद्यातील कलम 135 C अंतर्गत हा आदेश दिला. या कायद्यानुसार सर्व देशी दारु, ताडी आणि अन्य मद्यविक्री दुकान मालकांनी मतदानाच्या एक दिवस आधी (19 ऑक्टोबर) संध्याकाळी 6 वाजल्यानंतर दुकान बंद ठेवावीत. ही सर्व दुकाने मतदानाच्या दिवशी (20 ऑक्टोबर) आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी (21 ऑक्टोबर) रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील. तसेच मतमोजणीच्या दिवशी (24 ऑक्टोबर) ही दारु विक्रीची दुकान बंद ठेवावीत असेही या निर्णयात म्हटलं होतं. पण आता मुंबई उच्च न्यायालयाने बदल केला आहे. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मद्यविक्रिची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. 

मुंबईतील जिल्हाधिकाऱ्यांनी 4 ऑक्टोबर रोजी मतदानादिवशी मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जारी केला होता. या आदेशाला महाराष्ट्र वाईन मर्चंट्स असोसिएशनने कडाडून विरोध केला होता. तसेच याविरोधात वाईन मर्चंट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली होती. 'जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय जाहीर करताना मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर अन्य जिल्ह्यात दुकानं सुरु ठेवण्यात यावी असे नमूद केलं आहे. मात्र या मुंबईला वगळण्यात आले आहे. त्यामुळे हा संपूर्ण आदेश हा मनमानी असून यामुळे व्यवसाय करणाऱ्या अधिकाऱ्यावर गदा येऊ शकते.' असे वाईन मर्चंट असोसिएशन यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे वाईन विक्रेत्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यताही याचिका कर्त्यांनी वर्तवली आहे. त्यानंतर येत्या गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यानंतर दुकान सुरु ठेवावीत असा निर्णय उच्च न्यायलयाने दिला आहे.