'नाईलाजाने उभं राहावं लागतंय, हे विरोधकच सांगतात'

एकाच मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम 

Updated: Oct 1, 2019, 05:35 PM IST
'नाईलाजाने उभं राहावं लागतंय, हे विरोधकच सांगतात' title=

रविंद्र कांबळे, झी २४ तास, सांगली : विधानसभा निवडणूक २०१९ साठी मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. याच मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडून येण्याचा विक्रम याअगोदरच जयंत पाटील यांनी केलाय. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आमदार जयंत पाटील यांनी आपल्या विरोधकांवर बोचऱ्या शब्दांत टीका केली.

Image result for jayant patil ncp
राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत पाटील

'माझ्या मतदारसंघातील माझे सर्व विरोधकही माझे मित्रच आहेत. माझ्याविरोधात उभा राहणारा उमेदवारच मला फोन करून सांगतो की नाईलाजाने उभं राहावं लागतंय...' असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. 

लोकांतून निवडून आल्याशिवाय मुख्यमंत्री होता येत नाही, अशा मानसिकतेतून चंद्रकांतदादा हे कदाचित पुण्याला जात असावेत, पण पुणेकर त्यांचं स्वागत कसे करतील ते लवकरच कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना लगावला. दरम्यान, मंगळवारी भाजपाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या १२५ उमेदवारांच्या यादीत चंद्रकांत दादा पाटील यांना कोथरुडमधून संधी मिळालीय.