ओवेसींसमोर कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून इच्छुक उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन

 एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी प्रचाराचा नारळ फोडला. 

Updated: Oct 3, 2019, 11:18 AM IST
ओवेसींसमोर कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून इच्छुक उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसी यांनी प्रचाराचा नारळ फोडला. पहिली सभा घेत त्यांनी उमेदवारांना निवडून द्यायचं आवाहन केलं. यावेळी तिकीट न मिळालेले इच्छुक जावेद कुरेशी यांनी सभा सुरू असतांना शक्तिप्रदर्शन केले. कार्यकर्त्यांच्या खांद्यावर ते बसून आले आणि आणि स्टेज समोरच बॅरिकेड तोडत त्यांनी मंचावर प्रवेश मिळवला. 

जवळपास दहा मिनिटं सभा सुरु असताना हा गोंधळ सुरू होता. मात्र नंतर ओवेसींनी हा सगळा प्रकार शांत केला आणि सभेला सुरुवात झाली. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर कडाडून टीका केली. गांधीजींची हत्या करणारे आज त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत अशा भाषेत ओवेसी बोलले. 

गोडसे यांची विचारधारा जपणाऱ्या तोंडी गांधीचं नाव शोभत नाही. गांधीची विचारधारा आधी समजून घ्या असा टोलाही त्यांनी लगावला. औरंगाबादमध्ये उमेदवारी जाहीर झाल्याबरोबर यांची ही पहिलीच सभा होती. या सभेत त्यांनी वंचितवर बोलण्याचे टाळले.

विधानसभा निवडणूक 2019 साठी एमआयएमने आपली 5 वी यादी जाहीर केली आहे. एमआयएमने परभणी,बीड, नागपूर कोल्हापूर औरंगाबाद अहमदनगर येथील आपले उमेदवारी जाहीर केले आहेत. त्यांनी आतापर्यंत 24 उमेदवार जाहीर केले आहेत. वंचित बहुजन आघाडीशी फारकत घेऊन एमआयएमने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमची ताकद असलेल्या 50 जागांवर उमेदवार उभे करु असे त्यांनी आधीच जाहीर केले आहे.