मुंबई : विधानसभा निवडणूक २०१९ दरम्यान बीडमधल्या बहिण - भावाची लढाई आता पोलिसांपर्यंत गेली आहे. परळी विधानसभा मतदार संघात युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे विरुद्ध आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे हे चुलत भाऊ-बहिण एकमेकांसमोर उभे ठाकलेत. धनंजय मुंडे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओत ते पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत असल्याचा भाजपाचा आरोप आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर परळी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणावर पहिल्यांदा पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे. आपल्या भावाकडून झालेल्या आरोपनंतर रात्री उशिरा पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी आलेल्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. मला राजकारणातून काही कमवायचे नाही,पण ज्या पद्धतीने आरोप खालच्या पातळीवरून केले जात आहेत ते पाहून मन व्यथित झाले अस त्या म्हणाल्या.
राज्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यावर बदनामीकारक हातवारे करून महिलेची बदनामी केल्या प्रकरणी परळी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी कलम ५०० (महिलांसाठी अपमानकारक शब्द वापरणे ), ५०९ (शाब्दिक छेडछाड) आणि २९४ (अश्लील कृत्य) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. धनंजय मुंडे यांनी विडा येथील सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत भाजपा कार्यकर्त्यांनी धनंजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, परळी पोलिसांत जुगलकिशोर लोहिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.