अरुण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पुण्यामध्ये भाजपाने ३ विद्यमान आमदारांना घरचा रस्ता दाखवत ४ नवे उमेदवार दिले आहेत. आठापैकी चार जागांवर मात्र विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. अखेर युतीच्या जागावाटपात पुण्यातल्या आठही जागा आपल्याकडे राखण्यात भाजपाला यश आलंय. तीन विद्यमान आमदारांचा पत्ता कापण्यात आला आहे. तर गिरीश बापटांच्या जागी महापौरांना संधी देण्यात आली आहे.
शिवाजीनगर मतदारसंघातून विजय काळे यांना तिकिट नाकारण्यात आले आहे. तिथून खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिरोळेंची वर्णी लागलीये. ५ वर्षांमध्ये काळे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. तसंच पक्षातूनही त्यांना विरोध होता. कॅन्टॉनमेंटमधून माजी राज्यमंत्री दिलीप कांबळेंचा पत्ता कट झाला आहे. त्यांच्या जागी त्यांचे बंधू आणि स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना संधी देण्यात आलीये. कांबळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं त्यांचं मंत्रिपद गेलं होतं.
मतदारसंघात चांगला जनसंपर्क असूनही कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णींना घरी बसावं लागणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी त्यांनी जागा रिकामी केलीये.तर, कसब्याचे आमदार गिरीश बापट लोकसभेमध्ये गेल्यामुळे तिथून महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे.
उमेदवार निश्चितीवरून पुण्यात काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळतेय. पक्ष घराणेशाहीला महत्त्व देत असल्याची तक्रार करत शिवाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांनी आंदोलन छेडले आहे. याखेरीज पर्वतीमधून माधुरी मिसाळ, वडगाव शेरीमधून जगदीश मुळिक, खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर आणि हडपसरमधून योगेश टिळेकर यांची उमेदवारी पक्षानं कायम ठेवली आहे. अर्थात या चार ठिकाणीही काही प्रमाणात कुरबुरी आहेत... आता भाजपाच्या चार नव्या आणि चार जुन्या उमेदवारांचं भवितव्य जनता ठरवणार आहे.