विशाल करोळे / औरंगाबाद : बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कंपनी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आली आहे. अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालेय. दोघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
कुठल्या न कुठल्या मार्गानं शेतकऱ्यांची फसवणूक ही जणू नेहमीची बाब झालीय. त्यात बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी एक बोगस सीड कंपनी औरंगाबाद पोलिसांनी उध्वस्त केलीय. अनेक शेतकऱ्यांना या कंपनीनं गंडा घातल्याचं पुढं आलंय.
औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक करणारं एक रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केलंय. औरंगाबादच्या एका नामांकित कंपनीच्या नावानं ही कंपनी बोगस बियाणं विकायची. केवळ औरंगाबादेतच नव्हे तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा या कंपनीकडून बियाणं विक्री सुरु होती.
मात्र काही शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या कंपनीवर छापा टाकला. सोबतच त्यांच्या बुलढाणा, नगर आणि औरंगाबादच्या गोडाऊनवर छापे टाकत लाखो रुपयांचं बियाणं जप्त करुन गोडाऊनला टाळं ठोकलंय. याद्वारे अनेक शेतक-यांचं नुकसान झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
या बियाण्यांचा खरेपणा दाखवण्यासाठी या कंपनीच्या मालकांनी कृषी महाविद्यालयाच्या शास्त्रज्ञ आणि ग्रेडरचे बोगस स्टॅम्प सुद्धा बनवले होते त्याद्वारे सर्टीफिकेशन करून हे बियाणं विकण्यात येत होतं. धक्कादायक म्हणजे हा बोगस बियाणं विकणारा मालक, एका नामांकित बियाणे कंपनीचा भागीदार होता. त्या भागीदारीतच त्यानं हा गोरखधंदा सुरु केला होता मात्र मूळ मालकानं याची तक्रार केली आणि दोन आरोपींना अटक झालीये तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी कारवाई करून भविष्यातील अनेक शेतक-यांची हानी नक्कीच थांबवली मात्र आतापर्यंत ज्यांची फसवणूक झाली त्यांचं काय? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळं अशा बियाण्यांबाबत कृषी विभागानंही डोळं उघडे ठेवून कारवाई करण्याची गरज आहे.