कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका

कच-याच्या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला जोरदार झटका दिलाय.

Updated: Mar 6, 2018, 08:11 PM IST
कचरा प्रश्नावरुन औरंगाबाद खंडपीठाचा महापालिकेला झटका title=

औरंगाबाद : कच-याच्या प्रश्नावर औरंगाबाद खंडपीठानं महापालिकेला जोरदार झटका दिलाय. औरंगाबाद खंडपीठानं नारेगाव कचरा डेपोत कचरा न टाकण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत. अंतिम तोडगा निघेपर्यंत कचरा टाकू देण्याची विनंती महापालिकेनं केली होती. मात्र खंडपीठानं ती फेटाळलीय. त्यामुळे कचराकोंडी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

नारेगाववासियांची भावना समजून घेत गेल्या 33 वर्षांपासून विनापरवाना कचरा टाकला जात असल्याचं न्यायालयानं मान्य केलंय. मात्र उद्या सकाळी कच-याप्रकरणी यासह सर्व याचिकांवर  सुनावणी होणार आहे. त्यामुळं उद्याच्या निर्णयावर कचराकोंडींचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र तुर्तासतरी नारेगाववासियांना औरंगाबादच्या कच-यापासून दिलासा मिळालाय.

दरम्यान औरंगाबादच्या कचरा प्रश्नाचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. यावेळी विरोधकांनी स्वच्छ भारत अभियानाचा दाखला देत सरकारला धारेवर धरलं. तर पुढच्या सहा महिन्यात कच-याचा प्रश्न मार्गी लावणार असून तोपर्यंत ग्रामस्थांनी विरोध न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. मात्र यापुढे क्षेपणभूमीसाठी सरकार जागा देणार नसून केवळ कच-याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी जमीन देणार असल्याची महत्त्वपूर्ण निर्णय़ही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जाहीर केला.