यवतमाळ: अवनी वाघिणीच्या मादी बछड्याला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. अवनी वाघिणीला सी-1 आणि सी-2 हे दोन बछडे असून सी-2 या मादी बछड्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले. कक्ष क्रमांक ६५५ मध्ये ही मोहीम यशस्वी झाली असून आता सी-1 या नर बछड्याला पकडण्याच्या मोहीमेला गती देण्यात आली आहे. १३ ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या नरभक्षक टी-1 वाघिणीला वनविभागाने ठार मारले होते. यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षकाच्या आदेशानुसार तिच्या दोन्ही बछड्यांना बेशुद्ध करून पकडण्याची मोहीम वनविभागाने हाती घेतली होती. या बछड्यांच्या शोधात मागील दीड महिन्यांपासून विशेष मोहीम राबविली जात होती.
अवनी वाघिणीची हत्याच केली, NTCA चा अहवाल
अखेर शनिवारी अंजी-तेजणी परिसरातील कक्ष क्रमांक ६५५मध्ये सकाळी साडेपाच वाजता बछडे असल्याची माहिती मिळाल्याने मोहीम सुरू करण्यात आली. दुपारी बछडे दिसून आल्याने सारेच सावध झाले. त्यातील एका बछड्याला कुंपणाच्या कोपऱ्यात नेण्यात आले. नंतर कुंपणाला पांढऱ्या कापडाने गुंडाळले. डॉ. अखिलेश मिश्रा यांनी हत्तीवरून डार्ट मारला. पहिला प्रयत्न फसल्याने पुन्हा दुपारी ३ वाजता दुसरा प्रयत्न करण्यात आला. हा डार्ट लागल्याने पंधरा मिनिटानंतर बछडा बेशुद्ध पडला. या बछड्याची रवानगी पेंच व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली आहे.
अन्नही मिळवता न येणारे 'अवनी'चे बछडे सुखरुप सापडणार?
अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर प्रचंड आरोप-प्रत्यारोप झाले. याप्रकरणी राज्यसरकारलाही धारवर धरण्यात आले होते. मात्र, सर्व नियमानुसार झाल्याचे स्पष्टीकरण राज्यसरकारमधील मंत्र्यांनी दिले होते. मात्र, हे स्पष्टीकरण खोटे असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन मंडळाच्या अहवालात पुढे आली होती.