Lawrence Bishnoi Gang : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांनी पुण्यात अड्डा बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. बाबा सिद्दीकींची हत्येचा कट आखण्यासाठी हरियाणातून आलेल्या गुंडांनी पुण्यात अड्डा बनवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. पुण्यातील वारजे भागात प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांनी भंगाराचा व्यवसाय सुरु केला होता. बाबा सिद्दीकींचा शूटर शिवानंद उर्फ शिवा, धर्मराज कश्यप आणि करनैल सिंग हे पुण्यात राहत होता. पुण्यातून मुंबईत जाऊन या शूटर्सनं रेकी केल्याची माहिती आहे.
याच भंगाराच्या दुकानात प्रवीण लोणकर आणि शिवा काम करायचे.... भंगाराच्या व्यापाराच्या नावाखाली हे सुपारी किलर पुण्यात राजरोसपणे वावरत होते. धक्कादायक बाब म्हणजे या भंगारवाल्या गँगस्टरचा पुणे पोलिसांना साधा सुगावाही लागला नाही.
लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करणाऱ्या लोणकर बंधूंनी पोलिसांना चकवा देण्यासाठी भंगाराचं दुकान थाटलं होतं. बाबा सिद्दीकींच्या हत्येतील शूटर्स स्वतः भंगार गोळा करण्यासाठी परिसरात फिरत होते अशी माहिती आहे. बाबा सिद्दीकींच्या ऑफिसची रेकी करण्यासाठी ते पुण्यातून मुंबईला अनेकवेळा गेल्याची माहिती समोर आलीय. जेव्हा बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा प्लॅन ठरला तेव्हा त्यांनी मुंबईतील कुर्ल्यात मुक्काम हलवला होता.
धक्कादायक बाब म्हणजे पुण्यात लॉरेन्स-बिश्नोई गँगनं अड्डा तयार केलेला असताना पुणे पोलिसांना कोणताही सुगावा लागला नव्हता... पुण्यात गुंड शरद मोहोळची झालेली हत्या... कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील दोन आरोपी पोलिसांना सापडलेले नाहीत. त्यामुळं गुंडापुंडाचं पुणे आश्रयस्थान झालंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय.