Babasaheb Ambedkar Jayanti: डॉ. बाबासाहेबांची जयंती देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी जनतेची रिघ लागली आहे. राजकीय नेत्यांनीदेखील मध्यरात्रीपासून बाबासाहेबांच्या स्मारकाला भेटी देण्यास सुरुवात केली आहे.
वरळीतील आंबेडकर भवन येथे देखील मध्य रात्री 12 वाजता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन केलं. तसेच जयंतीच्या कार्यक्रमात सहभागी झाले. बँड वाजवत वरळीकरांच्या जल्लोषात आदित्य ठाकरेदेखील सहभागी झालेले दिसले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे आणि विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांच्यासह शेकडो वरळीकरांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं.
पालकमंत्री दादा भुसे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. भीम जयंती उत्सवाला नाशिक मधील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. धुळे लोकसभेच्या मवीआच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव, लोकसभेचे मवीआचे उमेदवार राजा भाऊ वाजे आणि मोठ्या संख्येयने भिम सैनिक देखील उपस्थित होते.
कल्याण पूर्वेत श्रीकांत शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केलं. स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेबांचा सगळा जीवन प्रवास दाखवण्यात आलाय. त्यामुळे महाराष्ट्रातलं हे एकमेव असं स्मारक आहे जिथे अशा प्रकारे हे काम करण्यात आल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं .यावेळी या स्मारकाच्या ठिकाणी शेकडो-भीम अनुयायी बाबासाहेबांच्या 133 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आले होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं.महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी म्हात्रे सोबत उपस्थित होते. त्याचबरोबर मध्यरात्री आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भीम अनुयायी कल्याण पश्चिमेत जमले होते. आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून म्हात्रे यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं .तसेच राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यावर टीका केली आहे. चष्मा बदलण्याची वेळ कपिल पाटील यांच्यावर आलेली आहे. मी बदलापूरला गेलो होतो प्रत्येक बिल्डिंगमध्ये नगरसेवकाच्या निवडणुकी प्रमाणे कपिल पाटील प्रत्येक बिल्डिंग मध्ये फिरत आहेत. खासदारांना रस्त्यावर यावे लागले आहे. कपिल पाटील हे आमदार किंवा नगरसेवक नाहीत तर खासदार आहेत. त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून काय काम केली? ती जनतेसमोर मांडवी. मी त्यांच्यासमोर बसायला तयार असल्याचे बाळ्या मामांनी यावेळी सांगितले.