अनिरुद्ध दवाळे, अमरावती - राज्यात राज्यसभेच्या निवडणुकीला वेग आला आहे. राजकीय पक्षामध्ये राज्यसभेवर उमेदवार पाठण्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. राज्यसभेच्या 6 जागांसाठी राज्यातून सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने तीन उमेदवार दिलेत, शिवसेनेने दोन उमेदवार दिलेत तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार दिला आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक पक्ष अपक्ष आमदारांना आपल्या बाजुने मत वळवण्यासाठी अपक्ष आमदारांची आणि छोट्या घटक पक्षाची मनधरणी करत आहे. असे चित्र असताना मात्र राज्याचे महाविकास आघाडीचे मित्रपक्ष आणि राज्याचे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना राज्यसभेच्या निवडणुकीवरुन तंबी दिली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. राज्यात धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाची व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने पावले उचलावी अशी कडूची मागणी आहे. पण ही जर मागणी दुर्लक्षित केली तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशारा सुद्धा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. कडूंच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे महाविकास आघाडी मतांची जुळवाजुळव करत असताना मित्रपक्षाच्या या इशाऱ्यानंतर महाविकास आघाडी पुरती कात्रीत अडकली आहे.
राज्यातील एक लाख हरभरा उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र केंद्र सरकारने हात वर केले आहेत. राज्यात धान उत्पादन शेतकरी चार ते पाच लाखांच्या संख्येत आहेत. शेतकऱ्यांनी उगवलेले धान खरेदी करायला केंद्रसरकार तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. पंरतु ही खरेदी केंद्र सरकारनेच करावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी आणि पवार साहेबांनी मोदींची भेट घेवुन त्यांना शेतकऱ्यांची व्यथा सांगितली पाहिजे असे मत बच्चू कडू यांनी मांडले. या साऱ्या प्रयत्नानंतर ही केंद्र सरकार धान आणि हरभरा खरेदी करण्यासाठी नकार दर्शवला तर किमान एका हेक्टरला चार हजार रुपये मदत हरभरा उत्पादक आणि धान उत्पादकांना राज्यसरकाने केली पाहिजे अशी मागणी राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात राजकारण चांगलेच पेटलेले पाहायला मिळत आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन मत कडू यांच्याकडे आहेत. आता कडू यांच्या इशाऱ्यानंतर विरोधकासह सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा भुवया उंचावल्या आहेत. राज्यमंत्री बच्चू कडू आता आपली दोन मते कोणाच्या पारड्यात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.