पायाभूत सुविधांच्या अभावामुळे औरंगाबादमध्ये पर्यटकांची संख्या रोढावली

औरंगाबादमध्ये पर्यटकांचा आकडा कमालीचा घसरतो आहे.

Updated: Jul 5, 2019, 06:12 PM IST
पायाभूत सुविधांच्या अभावामुळे औरंगाबादमध्ये पर्यटकांची संख्या रोढावली title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी म्हणून औरंगाबाद शहर ओळखलं जातं. अनेक देशी विदेशी पर्यटकांचा इथे राबता असतो. मात्र सध्या या पर्यटननगरीचे पुरते हाल सुरु आहेत. सध्या औरंगाबादमध्ये पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडावली आहे, या क्षेत्रात काम करणा-यांचा धंदा ८० टक्क्यांपर्यंत घसरला आहे, आणि त्यामुळे खरच हे अजिंठा, एलोरा, बीबीका मकबरा अशा ऐतिहासिक वास्तू असलेले शहर आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरंतर याच पुरातन वास्तूने या शहराला नाव दिलं, ओळख दिली. भारतात गेले तर अजिंठा नक्की पाहा असंही म्हटलं जातं होतं. मात्र सध्या हिच ओळख पुसली जात आहे. या शहरात येणा-या पर्यटकांचा आकडा कमालीचा घसरतो आहे. याचं कारणं ठरतंय अपु-या सुविधा. या शहराला रेल्वेने देशासोबत जोडण्यात आलं नाही, नावाला शहरात आतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आहे, मात्र जेटची विमानसेवा बंद झाल्यापासून आता केवळ एअर इंडियाच्या एका विमानावरच शहर अवलंबून आहे.

सगळ्यात कहर म्हणजे अजिंठाला जाणा-या रस्त्याचं बांधकाम तब्बल दोन वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाण्यासाठी सध्या अजिंठ्याचं नाव जरी घेतलं तरी गाडीचालक त्या रस्त्यावर जायला नकार देतात. या सगळ्यामुळे पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या ६ महिन्यात देशी-विदेशी पर्यटकांची संख्या कमालीची कमी झाली आहे. परदेशातील ट्रॅव्हल एजंट तर आता औरंगाबादचे बुकींगही घेत नसल्याचे या भागातील नागरिक सांगतात.

गेल्या ६ महिन्यांत असा घसरला पर्यटकांचा टक्का

महिना देशी पर्यटक विदेशी पर्यटक
डिसेंबर 48811 3948
जानेवारी 37246 3888
फेब्रुवारी 21431 4620
मार्च 15942 3039
एप्रिल 9676 955
मे 14957 550

शहरातील विमाने बंद झाली, रस्त्यांची स्थिती चांगली नाही, पर्यटन कोलमडंलय. मात्र प्रशासन, स्थानिक पुढारी याबाबत काहीही करत नसल्याचंच चित्र आहे. त्यामुळे या परिस्थितीवर आता औरंगाबाद खंडपीठानेच सु मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेत अजिंठा महामार्ग दुरुस्ती, हवाई वाहतूक सेवेचा विस्तार, रेल्वे सेवा सुधारावी वाढवावी अशा पद्धतीच्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकारसह १२ प्रतिवादींना हायकोर्टाने नोटीस बजावली आहे.

या सगळ्याबाबत आता उशिराने पुढा-यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. शहराचे महापौर आता याबाबत बैठका घेणार आहेत, तर औरंगाबाद आणि जालनाच्या खासदारांनी उशीराचे शहाणपण घेत, नागरी उड्डाण मंत्र्यांचीही भेट घेतली आहे. इतकंच नाही तर राज्याचे पर्यटन मंत्रीदेखील औरंगाबाद शहराचे पर्यटन कोलमडलं असल्याचं मान्य करतात, मात्र यासाठी उपायांवर ते काही बोलताना दिसत नाही.

शहराची ही अवस्था दुर्दैवी आहे. पर्यटनाचं शहर असुविधा आणि रस्त्यांच्या धुळीत हरवलं आहे. ऐतिसासिक वास्तूचं माहेरघर जणू अखेरच्या घटका मोजतं आहे, आणि शहराचा विकासाचा भार ज्यांच्यावर आहे, ते फक्त प्रेक्षक झाले आहेत, अशीच अवस्था राहिली तर खरचं औरंगाबाद शहराचं नाव पर्यटनाच्या नकाशात राहिल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.