कणकवली: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्येसाठी प्रशासनाला जबाबदार धरत महामार्ग उपउभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. कणकवली पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी नितेश राणे यांना ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने नितीश यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. नितेश यांच्यासह त्यांच्या १८ समर्थकांची रवानगीही पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
या सुनावणीवेळी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने राणे यांचे समर्थक जमले होते. या प्रकरणात नितेश यांना जामीन मिळेल, असे त्यांना वाटत होते. मात्र, न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केल्याने समर्थकांना मोठा धक्का बसला. नितेश यांचे बंधू निलेश यांनी न्यायालयाच्या निर्णयाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. नितेश राणे यांनी जनतेचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता त्यांना या प्रकरणात गोवले जात असल्याची प्रतिक्रिया निलेश राणे यांनी व्यक्त केली.
नितेश राणे आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सकाळी मु्ंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसाठी सरकारला जबाबदार धरत महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली होती. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधूनही ठेवण्यात आले होते.
Nitesh Narayan Rane and his supporters sent to police custody till July 9. He and his supporters were arrested for throwing mud on an engineer in Kankavali. #Maharashtra (File pic) pic.twitter.com/9JZ5Mf3ooc
— ANI (@ANI) July 5, 2019
या प्रकाराबद्दल नितेश यांचे वडील नारायण राणे यांनी माफीही मागितली होती. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी सांगितले होते.