भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा दणका, वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई

भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे.

Updated: Jul 16, 2021, 11:29 AM IST
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा दणका, वैद्यनाथ साखर कारखान्यावर कारवाई title=
Pic Courtesy: Pankaja Munde Facebool

बीड : भाजप (BJP) नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे आणि पीएफच्या (PFO) थकबाकीपोटी 92 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. ही कारवाई ईपीएफओ औरंगाबाद कार्यालयाने केली आहे. (Bank account  sealed of Pankaja Munde's Vaidyanath Sahakari Sugar Factory)

भविष्य निर्वाह निधी थकबाकीदारांविरुद्धची या वर्षातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. कारखान्याच्या (पांगरी, परळी वैजनाथ, जिल्हा बीड) आस्थापनेची मार्च 2018  ते ऑगस्ट 2019 काळासाठीची पीएफची 1 कोटी 46  लाख रुपये थकबाकी होती. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवा यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी एस आर. वानखेडे यांनी ही कारवाई केली. 

पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आहे. पगार न मिळाल्यामुळं कारखान्यातील 700 कामगारांनी मागील मार्च महिन्यात बंद पुकारला होता. मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत पगारासाठी अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता. पीएफच्या थकबाकीपोटी 92  लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. औरंगाबाद ईपीएफओ कार्यालयाने ही कारवाई केली. 

कारखान्याने मार्च 2018 ते ऑगस्ट 2019 कालावधीतील पीएफचा भरणा केला नव्हता. पीएफपोटी थकीत रक्कम 1 कोटी 46 लाख रुपये आहे. त्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली. उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सर्व भविष्य निधी थकबाकीदारांनी  थकीत भविष्य निधी देयकांचा भरणा त्वरीत करावा, असे आवाहन क्षेत्रीय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.