Eknath Shinde यांच्या समर्थनार्थ ठाण्यात बॅनरबाजी, उद्धव ठाकरे यांचा फोटो मात्र गायब

ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

Updated: Jun 22, 2022, 02:42 PM IST
Eknath Shinde यांच्या समर्थनार्थ ठाण्यात बॅनरबाजी, उद्धव ठाकरे यांचा फोटो मात्र गायब title=

मुंबई : सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यात सत्तापरिवर्तन होण्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाण्याचे पालकमंत्री तथा महविकास आघाडी सरकारचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Eknath Shinde Supporters)

विधान परिषदेच्या निवडणुकी दरम्यान नगर विकास खात्याचे मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर काल दिवसभर राजकीय गदारोळ सुरू होता. मात्र आज ठाण्यातील काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र ठाण्यातील कळवा परिसरातील काही एकनाथ शिंदे समर्थकांनी आज कळवा येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. 

आम्ही एकनाथ शिंदे यांचे समर्थक असल्याचा बॅनर लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी 'आम्ही शिंदे साहेब समर्थक' असा मजकूर लिहून बॅनरवर सर्व शिवसैनिक नेत्यांचे फोटो वगळून फक्त बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे या दोन जणांचे फोटो लावण्यात आले आहे. या बॅनर मधून चक्क उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील वगळला आहे.

'आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे राहू आणि एकनाथ शिंदे ज्या पक्षामध्ये प्रवेश घेतील त्याला आमचं समर्थन असल्याचं समर्थकांकडून सांगण्यात आलं आहे.'