फ्रिज, एसी, सोफा अन्... मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी 'व्हॅनिटी व्हॅन'

 Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शनिवारी अंतरवाली सराठी येथून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मराठ्यांसह 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहेत.

Updated: Jan 19, 2024, 02:42 PM IST
फ्रिज, एसी, सोफा अन्... मराठा आरक्षणाच्या पायी मोर्चात मनोज जरांगेंसाठी 'व्हॅनिटी व्हॅन' title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : मराठा समाजाच्या लोकांना सरसकट आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला चलो मुंबईची हाक दिली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आम्ही 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघणार आहोत. 26 जानेवारीला आमचा मार्चा मुंबईत धडकेल. शिवाजी पार्क किंवा आझाद मैदानावर प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला आम्ही सुरुवात करणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दुसरीकडे मोर्चासाठी जरांगे पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. अशातच आता जरांगेच्या मुंबईपर्यंतच्या प्रवासासाठी व्हॅनीटी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील शनिवारी मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुंबईपर्यंतच्या मोर्चाची तयारी सध्या गावोगावी पाहायला मिळते. दरम्यान मुंबईकडे जाताना जरांगे पाटील यांचा प्रवास आरामदायी आणि सोईस्कर व्हावा यासाठी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी व्हॅनीटी व्हॅनची सोय केली आहे. आता ही व्हॅन बीडमध्ये दाखल झाली असून मुंबईपर्यंत ती मनोज जरांगे यांच्यासाठी मोर्चात असणार आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलनात असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत चांगली राहावी यासाठी ही सोय करण्यात आलाचे गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं आहे. या व्हॅनीटी व्हॅनमध्ये सोफा, आरसा, छोटा फ्रिज, ओव्हन, एसी अशा सुविधा असणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईतील आंदोलनाची दिशा कशी असेल आणि अंतरवाली ते मुंबई पायी जाण्यासाठी मुक्कामाचे टप्पे कोणते असतील, याची माहिती दिली. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली येथून मोर्चा निघणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. तर सकाळी निघाल्यावर ज्यांना शक्य असेल, त्यांनी चालायचंय आणि ज्यांना शक्य नाही, त्यांनी गाडीत बसून प्रवास करायचा आहे. दररोज दुपारी 12 वाजेपर्यंत चालायचं आहे. 12 नंतर सर्वांनी आपापल्या वाहनात बसून पुढील प्रवास गाडीने करायचा, असेही मनोज जरांगेंनी सांगितले.

अंतरवली ते मुंबई प्रवासातील मुक्कामाचे टप्पे 

20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात

21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)

22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)

23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे

24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा

25 जानेवारी 6 वा. मुक्काम – वाशी, नवी मुंबई

26 जानेवारी 7 वा. मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी