भाजपा आणि संघाला उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का, म्हणाले 'यासाठी मर्दानगी लागते'

भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला.   

शिवराज यादव | Updated: Jan 19, 2024, 02:39 PM IST
भाजपा आणि संघाला उद्धव ठाकरे गटाकडून मोठा धक्का, म्हणाले 'यासाठी मर्दानगी लागते' title=

आम्ही गर्वाने हिंदू आहोत असं सांगत असताना काही नालायक लोक मात्र हिंदू, हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे. भगवा हा भगवाच असतो. श्रीकृष्ण, श्रीराम, भवानीमाता या सर्वांचा भगवा आहे. पण त्यातही काहीजण भेदभाव करत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर भाजपा आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. 

"आज तुम्ही सर्वांनी मोकळेपणाने आपल्या भावना मांडल्या. 'मन की बात' तर विचार करुन केली जाते. पण आज या सर्वांनी 'दिल की बात' सांगितली आहे," असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. "आम्ही काय केलं, कोणाला मदत केली याची मला आठवण करुन द्यायची नाही. 1992 नंतर मुंबईला शिवसेना आणि शिवसैनिकांनीच वाचवलं," याची आठवण त्यांनी करुन दिली. 

पुढे ते म्हणाले की, "दंगल, पाऊस असं मुंबईवर कोणतंही संकट येतं तेव्हा बाळासाहेबांनी आम्हाला मदत करण्याची शिकवण दिली आहे. रक्तदान करताना ते रक्त कोणाचं आहे हे आम्ही पाहत नाही. आम्ही कधीच भेदभाव करत नाही. तुम्ही परप्रांतीय, उत्तर भारतीय आहात असा भेदभाव केला नाही. आपण सगळे हिंदू आहोत". 

"त्यावेळी लोक हिंदू आहोत असं बोलायला घाबरत होते. तेव्हा बाळासाहेबांनी गर्वाने हिंदू आहोत अशी घोषणा दिली. हिंदू पुढे हिंदू म्हणून मतदान करतील अस बाळासाहेबांनी प्रमोद महाजनांना सांगितलं होतं. पण संघर्ष करणारे आता राहिलेले नाहीत. लाभ घेणारे वेगळे आहेत. हे फक्त शेकलेली भाकरी खात आहेत. पण ज्यांनी कष्ट घेतले ते आपल्यात नाहीत, आणि जे आहेत त्यांना लांब करण्यात आलं आहे," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

"मातोश्रीवर अनेकजण आम्हाला वाचवा म्हणून मदत मागण्यासाठी पुढे आले होते. पुढे जाऊन हे काय करतील याची कल्पना नव्हती. बाळासाहेबांनी ज्यांना वाचवलं तेच शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी संपवण्याचा प्रयत्न करावा यासाठी माझं जाहीर आव्हान आहे. आम्ही लढणारे आहोत. आम्ही त्यांना शत्रू समजलं नाही, त्यांनी शत्रू केलं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.  

"अशावेळी सोबत येणाऱ्यांचं महत्व वेगळं असतं. सत्ता आहे त्यांच्याकडे न जाता संघर्ष करणाऱ्यांकडे येणं यात खरी मर्दानगी आहे," असंही त्यांनी सांगितलं. उत्तर भारतीयांचं संमेलन करा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केली. त्यावेळी मी जे मनात आहे ते जाहीरपणे सांगेन असं ते म्हणाले. 

"भगव्यात फरक नसतो. भगवा हा भगवाच असतो. श्रीराम, कृष्ण, भवानी माता सर्वांचाच आहे.  नालायक लोक हिंदू, हिंदुत्वात भेदभाव करत आहेत. त्यांच्यापासून सावध राहा," असं आवाहनही त्यांनी केलं.

प्रवेश केलेल्यांची यादी -

प्रदीप उपाध्याय - भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव

घनश्याम दुबे - विश्व हिंदू परिषदेचे गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख व भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष

रविचंद्र उपाध्याय - विश्व हिंदू परिषदेचे उत्तर मुंबईचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष

अक्षय कदम - उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आंतरराष्ट्रीय बजरंग दल

माधवी शुक्ला - भाजप जिल्हा महिला उपाध्यक्ष मिरा-भाईंदर (पूर्व)

राम उपाध्याय - भाजप जिल्हा महासचिव, मिरा-भाईंदर

संजय शुक्ला - राष्ट्रीय महासचिव, अखिल भारतीय ब्राम्हण परिषद

प्रदीप तिवारी - शिंदे गट, मीरा - भाईंदर जिल्हा महासचिव

दीपक दुबे - विश्व हिंदू परिषद, जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली

दिनेशकुमार यादव - विश्व हिंदू परिषद, तालुका प्रमुख (प्रखंड) बोरिवली

सूरज दुबे - बजरंग दल तालुका (प्रखंड) प्रमुख