छेडछाडीला ती कंटाळली होती, पण तो पिछा सोडत नव्हता, अखेर तीने घेतला टोकाचा निर्णय

रोड रोमिओच्या छेडछाडीला कंटाळलेल्या अल्पवयीन मुलीने घेतला टोकाचा निर्णय

Updated: May 13, 2022, 08:43 PM IST
छेडछाडीला ती कंटाळली होती, पण तो पिछा सोडत नव्हता, अखेर तीने घेतला टोकाचा निर्णय title=

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : रोड रोमिओच्या छेडछाडीला कंटाळून बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे.

गावातील एका रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार मुलीच्या आईने दिल्यानंतर आरोपीविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दिपाली लव्हारे असं या मृत मुलीचं नाव आहे. 

नेमकी घटना काय? 
बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव या ठिकाणी दिपाली राहायला होती. एसटी विभागात असलेले दिपालीचे वडिल पालघरमध्ये रहात होते. दिपालीच्या घराशेजारी रहाणारा एक तरुण अनेकवेळा येता जाता तिची छेड काढत असे. याबाबत दिपालीने आपल्या आईलाही सांगितलं होतं. यानंतर दिपालीच्या आईने त्या मुलाला समज दिली. 

आईने दिपालीचीह समजूत काढली. आपण वडिलांना हा सर्व प्रकार सांगून काहीतरी मार्ग काढू असं तिला सांगितलं होतं. पण समज दिल्यानंतरही या रोडरोमिओकडून छेडछाडीचा प्रकार थांबला नाही. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या प्रकाराने दिपालीला नैराश्य आलं होतं. 

दिपालीने उचललं टोकाचं पाऊल
दोन दिवसांपूर्वी आई एका कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेलेली असताना घरी एकटीच असणाऱ्या दिपालीने गळफास घेत आत्महत्या केली. कार्यक्रम आटोपून घरी परतलेल्या आईने घराचा दरवाचा उघडताच तिला धक्का बसला. दिपालीला तातडीने आंबेजोगाई इथल्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण दाखल करण्याआधीच दिपालीचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.