बीड : सोशल मीडियामध्ये सध्या योगेश महादेव शेळके नावाच्या तरुणाची चर्चा आहे. त्याचा व्हिडीओ सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये आहे. यामध्ये त्याने बॅंक आणि विमा कंपन्यांच्या गैरप्रकाराचे अक्षरश: वाभाडे काढले आहेत. बॅंक आणि विमा पॉलीसी कंपन्या स्वत:च्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या माथी विमा पॉलीसी कशी उतरते याची कथा त्याने या व्हिडीओतून सांगितली आहे. ही कथा सांगताना योगेशचा प्रामाणिकपणा आणि शेतकऱ्यांविषयीची कळकळही तितकीच जाणवते. पाच ते दहा हजारचा फायदा मला मोठा नाही पण माझ्या शेतकरी बांधवांची लूट होता कामा नये अशी विनंती तो करतो. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला शेतकऱ्याची होणारी ससेहेलपट कळू शकते असेही तो सांगतो. सोशल मीडियामध्ये या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि बजाज इन्शुरन्स मिळून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची खोट्या सह्या करून १५ ते २० हजार रुपयांची पॉलिसी घेण्यास कसे भाग पाडतात ? शेतकऱ्यांची लूट कशी होते? शेतकऱ्यांच्या नावावर बँकेचे अधिकारी, बजाज इन्शुरन्सचे कर्मचारी कसे मजा मारतात ? याचा गौप्यस्फोट बीड जिल्ह्याच्या लोखंडी सावरगाव येथील योगेश महादेव शेळके या ३० वर्षीय तरुणाने व्हाट्सअँपच्या व्हिडिओद्वारे केले. शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेल्या फसवणुकीविरोधात मोठे बंड योगेशने पुकारले.
शेतकऱ्यांना कर्ज देताना बजाज अलाइंस इन्शुरन्स कंपनी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक मिळून शेतकऱ्यांची पिळवणूक करतात या योगेशच्या व्हिडिओचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. पण या व्हिडीओ प्रकारानंतर योगेश शेळकेला आता धमक्या येऊ लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून संबंधितांवर तसेच शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी योगेश शेळके या तरुणाने केली आहे.
योगेशच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओची बजाज विमा कंपनीने दखल घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात एक निवदेन जारी केले आहे. या व्हिडीओचे सत्य पडताळून दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.