अबकी बार, छम छम बीजेपी सरकार - भुजबळ

पुन्हा छम छम बार हेच आमचे बीजेपी सरकार. अबकी बार छम छम सरकार, अशा शब्दात भुजबळ यांनी भाजप सरकारची खिल्ली उडविली.  

Updated: Jan 18, 2019, 11:43 PM IST
अबकी बार, छम छम बीजेपी सरकार - भुजबळ title=

जळगाव : डान्सबारप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधारी भाजपवर जळगावात निशाणा साधला. भाजप सरकार एकीकडे म्हणते गाईला वाचवा आणि दुसरीकडे म्हणते बाईला नाचवा. पुन्हा छम छम बार हेच आमचे बीजेपी सरकार. अबकी बार छम छम सरकार, अशा शब्दात भुजबळ यांनी भाजप सरकारची खिल्ली उडविली. निर्धार परिवर्तनाचा संपर्क यात्रेनिमित्त राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत भाजपवर टीकास्त्र सोडले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी यावेळी उपस्थित होते. 

डान्सबारवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्यानंतर राज्यातील सरकारवर जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजप-शिवसेना सरकारला मोठे अपयश आले आहे. न्यायालयात चांगली बाजू मांडण्यासाठी वकील दिला नाही. त्यामुळे ही वेळ राज्यावर आली आहे. राष्ट्रवादीने डान्सबारवरील बंदी उठल्याने भाजपला जोरदार टोला लगावला आहे. डान्सबारसाठी छुपा पाठिंबा असल्याचा हल्लाबोल याआधी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नेते नवाब मलिक यांनी केला. आता छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवताना भाजपला जोरदार टोकले आहे. तर माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनीही हा राज्यासाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. 

सरकारवर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपनेही सावध पवित्रा घेतला आहे. डान्सबार बंदीसाठी हालचाल सुरु केली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारला अभय दिले असले तरी राज्य सरकार डान्सबार बंद करण्यासाठी सरसावले आहे. डान्सबार बंद करण्यासाठी गरज पडल्यास अध्यादेश काढणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'झी २४ तास'ला दिली.  राज्यात डान्सबार सुरूच होऊ देणार नाही, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी घेतली. डान्सबार बंदी कायम ठेवण्यासाठी सरकार काहीही करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात डान्सबार सुरू राहण्याबाबत दिलेल्या निकालानंतर मुनगंटीवार यांनी निकाल वाचल्यानंतर योग्य निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.