बीड जिल्हा परिषद भाजप राखणार का?, पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे

बीड येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Updated: Jan 3, 2020, 11:31 PM IST
बीड जिल्हा परिषद भाजप राखणार का?, पुन्हा धनंजय विरुद्ध पंकजा मुंडे title=

बीड : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे हे आपल्या बहीण पंकजा मुंडे यांना दे धक्का देणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, ही निवडणूक अटीतटीची असणार, हे नक्कीच आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी उद्या मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये सध्या भाजपची सत्ता असली तरी संख्याबळाचा विचार करता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चमत्कार घडवण्याची शक्यता आहे. बीड जिल्हा परिषदेत ५३ सदस्य अध्यक्षपदासाठी मतदान करणार आहेत. यात आजतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड दिसून येत आहे. 

राज्यातील सत्ता परिवर्तन आणि परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेले मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा बहिणीला दे धक्का देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना चकवा देत जिल्हा परिषद भाजपकडे खेचून आणण्यात बाजी मारली होती. मात्र, यावेळी काय चमत्कार होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.