'शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्या'

मनगुत्ती परिसरात कर्नाटकी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीमार

Updated: Aug 9, 2020, 04:41 PM IST
'शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्या'

प्रताप नाईक, झी मीडिया, बेळगाव: बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या घटनेनंतर बेळगावसह महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संतापले होते. रविवारी सकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. या सगळ्याची दखल घेत आता मनगुत्ती येथील स्थानिक प्रशासनाने बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली आहे. सर्व कायदेशीर बाबी तपासून पुतळा बसवू, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा काँग्रेसच्या आमदाराने हटवला- आशिष शेलार

मात्र, कालपासून आक्रमक झालेले मनुगत्तीमधील ग्रामस्थ काही केल्या ऐकायला तयार नाहीत. आजदेखील या ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत कर्नाटक सरकारचा निषेध केला. संतापलेल्या ग्रामस्थांनी कर्नाटकी पोलिसांनी चौकातून हाकलून दिले. यादरम्यान बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांची आक्रमक भूमिका कायम आहे. त्यामुळे सध्या मनगुत्ती परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काहीवेळापूर्वीच कर्नाटक पोलिसांनी लाठीमार करुन ग्रामस्थांना पांगवले. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी चिघळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपचे शिवाजी महाराजांबद्दलचे प्रेम हे फक्त मतांपुरतचे - जयंत पाटील

मुंबईत शिवसेना भवनाबाहेर येडियुरप्पांचा पुतळा जाळला
कर्नाटकातील या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उमटत आहेत. मुंबईतही शिवसेना भवनाबाहेर आक्रमक निदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारविरोधात घोषणा देत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावरुन पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे समजते.