उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे चोराने मंदिरातून चोरलेली राधा-कृष्णेची मूर्ती परत केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. चोराने आठ दिवसांपूर्वी ही मूर्ती चोरी केली होती. चोराने अष्टधातूची (आठ धातूची मिश्रधातू) मूर्ती क्षमायाचना पत्रासह परत केली आहे. यानंतर भक्तांनी या घटनेना “कलयुगातील चमत्कार” असं म्हटलं आहे.
शहरापासून 45 किमी अंतरावर असलेल्या शृंगावेरपूर धाम येथील गौ घाट आश्रमातून 24 सप्टेंबर रोजी अनेक शतकं जुनी मूर्ती चोरीला गेली होती. यानंतर मंदिराचे पुजारी फलाहारी महंत स्वामी जयराम दास महाराज यांनी नवाबगंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं. पोलीस मूर्ती शोधण्याचा प्रयत्न करत असतानाच खऱ्या चोराने माफीपत्रासह मूर्ती मंदिराजवळ सोडून दिली आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास एका व्यक्तीला आश्रमाजवळ ठेवण्यात आलेली मूर्ती नजरेस पडली आणि त्यांनी महंतांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच महंत व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मूर्ती ताब्यात घेतली.
माफीनामा पत्रात, चोराने सांगितलं आहे की, त्याने ही मूर्ती अज्ञानातून चोरली आणि हे कृत्य केल्यापासून त्याला भयानक स्वप्नं पडत होती. आपल्या मुलाच्या आजारपणामुळे त्याला आपली चूक कळली, असंही त्याने नमूद केलं आहे. मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात त्याने मूर्तीशी छेडछाड केल्याची कबुली दिली असून देवाकडे माफी मागितली आहे. मंदिरातील पुजाऱ्यांना त्याने मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना करावी अशी विनंती केली आहे.
कायदेशीर प्रक्रियेनंतर पोलिसांनी मूर्ती पुन्हा एकदा महंतांकडे सोपवली. यानंतर एका छोट्या कार्यक्रमाचं आयोजन करत मूर्ती पुन्हा मंदिरात बसवण्यात आली. दरम्यान चोराचे मनपरिवर्तन आणि माफीनामा पत्राने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी या घटनेवर कोणतंही अधिकृत भाष्य करणं टाळलं. अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, नवाबगंज पोलीस स्टेशनमध्ये चोरी आणि तोडफोड केल्याबद्दल एफआयआर नोंदवला गेला आहे. माफी मागून मूर्ती परत करणाऱ्या चोराचा शोध सुरू आहे.