प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडाऱ्यातून (Bhandara) अपघाताची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या 14 महिन्यांच्या बाळाचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्या मुलाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, लहान मुलांबाबत पालकांनी सतर्क राहणं किती गरजेचं आहे हे पुन्हा या घटनेनं समोर आलं आहे.
भंडारा जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. एका चौदा महिन्याच्या बाळाचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना तुमसर तालुक्यातील राजापूर येथे घडली. अदिक अतुल शहारे असे या मृत बाळाचे नाव आहे. वडील अतुल शहारे हा बाहेर जात असताना काही वेळाकरता अद्विकला शेजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं होतं. पण अद्विक शेजाऱ्यांच्या घरून आपल्या घरी परत आला होता. काही वेळातच अतुल परत आला तेव्हा त्याने अद्विक कुठे आहे अशी विचारणा शेजाऱ्यांकडे केली. तो कुठेही सापडत नसल्याने सर्वांनीच त्याचा शोध सुरु केला. मात्र अद्विकचा कुठेच शोध लागला आहे.
बराच वेळ शोध घेतला तरी अद्विक सापडत नव्हता. शेवटी घराच्या अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी काढत असताना अद्विक त्यात तरंगताना आढळला. सुरुवातील घरच्यांना हा सगळा प्रकार पाहून नक्की काय घडलंय कळलचं नाही. त्यांनी तात्काळ अद्विकला घेऊन डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला आहे. डॉक्टरांनी अद्विकची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलं. डॉक्टरांनी ही माहिती त्याच्या कुटुंबियांना देताच त्यांना जबर धक्का बसला. दरम्यान, या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.