प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारान (Bhandara News) जिल्ह्यात एका स्मशानभूमीत (cemetery) जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोत्यात आढळल्याने खळबळ उडाली आहे (Bhandara Crime). स्मशानभूमीत महिलेचा मृतदेह आढळल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी (Bhandara Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भंडारा येथून जवळच असलेल्या खरबी या गावातील स्मशानभूमीत हा मृतदेह आढळून आला आहे. अर्धनग्न अवस्थेतील महिलेचा मृतदेह हा एका पोत्यात बांधून तिथे स्मशानभूमीत सोडण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. भंडारा पोलिसांना या प्रकाराची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पोते खोलून पाहिले असता त्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची अद्याप ओखळ पटलेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून महिलेचा चेहरा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी जवाहरनगर पोलिसांचा ताफा दाखल झाला असून ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
पोलिसांनी काय सांगितले?
"जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये खरबी या गावाच्या स्मशानभूमीमध्ये अज्ञात आरोपीने एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला होता. अंदाजे 35 ते 45 वयोगटातील ही महिला असल्याचे समोर आले आहे. महिलेच्या हातात दोन बांगड्या होत्या. तसेच काळ्या रंगाचे मंगळसूत्रही गळ्यामध्ये आहे. या महिलेला एका पोत्यामध्ये बांधून याठिकाणी आणून टाकले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे," अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली.
हिंगोलीत आढळला पुरुषाचा सांगाडा
दुसरीकडे हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथून 28 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या एका विवाहित पुरुषाचा सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा सांगाडा वसमत तालुक्यातील सुकळी शिवारातील माळरानात आढळला. कृष्णा माधव तोरकड असे मृताचे नाव असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे कृष्णाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.
कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील 26 वर्षीय कृष्णा माधव तोरकड हा युवक 2 मार्च रोजी गावातून बेपत्ता झाला होता. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात कृष्णाच्या पत्नीने तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी कुरुंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकळी शिवारातील माळरानातील एका दरीत कृष्णाचा सांगाडा आढळून आला. कपड्यावरून हा सांगाडा कृष्णाचा असल्याचे स्पष्ट झाले.