Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून

Bhandara News : भंडाऱ्याता एका पोलीस अधिकाऱ्याने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर या महिला पोलीस अधिकाऱ्याने पहिल्या पेजवर बातमी येईल का असा सवाल पत्रकाराला करत खाकीची दबंगगिरी दाखवली.

आकाश नेटके | Updated: Mar 18, 2024, 12:10 PM IST
Bhandara News: महिला पोलीस अधिकारी रस्तावर गाडी लावून गेल्या बाजारात; वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पडली अडकून title=

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणत आहे. सायंकाळच्या सुमारास गांधी चौक ते एस टी स्टँड पर्यंत दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र या समस्या सोडवण्याऐवजी त्यात आणखी भर घालण्याचे काम शासकीय कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भंडाऱ्यात एका महिला पोलीस निरीक्षिकाने भररस्त्यात गाडी लावून वाहतूक कोंडी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकाराचे रेकॉर्डिंग करत असताना महिला पोलीस निरीक्षकाने पत्रकरालाच उर्मट प्रश्न करत पहिल्या पेजवर बातमी येईल का असं म्हटलं.

भंडाऱ्यात दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडींमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात आणखी भर पडली ते राष्ट्रीय महामार्ग सहायक पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांनी. रजनी तुमसरे या बाजारात खरेदी करायला आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांची चारचाकी गाडी रस्त्यावरच पार्क केली. त्यामुळे आधीच मोठ्या प्रमाणात वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. 

महत्त्वाची बाब म्हणजे रजनी तुमसरे यांच्या रस्त्यातील गाडीमुळे अँब्युलन्ससुध्दा या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती. जवळपास एक तास वाहतूक कोंडी निर्माण झाली. पण पोलीस निरीक्षिका रजनी तुमसरे यांच्यामुळे इतर नागरीक देखील गप्प होते. या सगळ्या प्रकाराची माहिती माध्यम प्रतिनिधींना मिळाली तेव्हा त्यांनी तिथे पोहोचून ही घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर वाहतूक शाखेने या गाडीवर दंड देखील आकाराला आहे. 

दरम्यान, दुसरीकडे व्हिडिओ काढत असलेल्या पत्रकरालाच उलट पहिल्या पेजवर बातमी येईल का असा उर्मट प्रश्न रजनी तुमसरे  यांनी विचारला आहे. त्यामुळे पोलीसच नियम मोडत असतील तर इतरांच काय? असा सवाल आता विचारला जात आहे.