'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी

Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.    

Updated: Dec 30, 2024, 02:01 PM IST
'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी title=
Bhandara News farmers son urges cm Devendra Fadnavis over farm products price and marriage issue

Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं असलं तरीही काही प्रश्न अनुत्तरितच असून, आता सामान्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारत त्यांच्याकडे मदतीसाठीची विनवणी केली आहे. एकिकडे राज्यात लग्नसराईचा माहोल सुरु असतानाच दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं एक वेगळीच परिस्थिती सर्वांसमक्ष आणण्याचा प्रयत्न या शेतकरी पुत्रानं केली आहे. 

मुख्यमंत्री साहेब शेतमालाला भाव द्या नाही तर... 

भंडारा जिल्ह्यात एका अनोख्या बॅनरची चर्चा सुरू आहे. सध्या संपूर्ण महाराष्टातील गावखेड्यांत लग्नसराई सुरू असतानाच शेतकऱ्यांकडे पाच ते दहा एकर शेती असूनसुध्दा कोणीच या शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी दाखवायला वा द्यायला तयार नाही. 

यामागे असंच काहीसं कारणंही आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही. याच परिस्थितीला अनुसरून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत 'एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या' अशी विनंतीवजा मागणीच शेतकरी पुत्रानं केली आहे. 

हेसुद्धा वाचा : नव्या वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात जाताय? काय करावं आणि काय करू नये... पोलिसांचा इशारा पाहूनच घ्या

'ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते. तेव्हा लोक आपल्या. मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाचे हातात देईल', असं म्हणत शेतकरी कुटुंबांपुढची आव्हानं आणि समाजाचा या कुटुंबांकडे पाण्याचा दृष्टीकोन या तरुणानं प्रकाशात आणला. 

आपली ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या', असे बॅनर भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकरनं झळकावले. यावेळी डोक्यात टोप आणि बाशिंग बांधून त्यानं हातात फलक घेत ही बॅनरबाजी केली आणि वर्ष सरता सरता राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी लक्ष वेधलं.