सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे : राज्यात सध्या पेपरफुटीचं पेव माजलं आहे. हा प्रकार 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत घडू नये यासाठी बोर्डानं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता थेट पीरक्षा हॉलमध्ये परीक्षार्थींच्या समोर प्रश्नपत्रिकांचं पाकीट फोडण्यात येणार आहे.
आतापर्यंत एका पाकिटात 50 प्रश्नपत्रिका असायच्या. मुख्य केंद्रात हे पाकिट फोडलं जायचं. त्यानंतर उपकेंद्रावरील संख्येनुसार पाकिटं भरली जायची. ही पद्धत आता बंद करण्यात आली आहे.
आता प्रत्येक पाकिटात केवळ 25 प्रश्नपत्रिका असतील. हे सीलबंद पाकिटच 40 मिनिटं बाकी असताना मुख्य केंद्रातून उपकेंद्रांवर पाठवली जातील. केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वी विद्यार्थ्यांसमोर ही पाकिटं उघडतील.
यामुळे सोशल मीडियावर पेपर लीक होण्याच्या घटनांना आळा बसेल, असा बोर्डाला विश्वास आहे. कोव्हिडच्या निर्बंधांमुळे आपापल्या शाळा-कॉलेजमध्येच परीक्षा होणार आहेत. त्यामुळे पेपरफुटीच्या घटना वाढण्याची भीती आहे.
याच पार्श्वभूमीवर मंडळानं परीक्षेच्या पद्धतीत हे महत्त्वाचे बदल केले आहे. त्यामुळे आता तरी परीक्षेआधीच व्हॉट्सअॅपवर पेपर फॉरवर्ड होणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. याशिवाय आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतला आहे. त्यामुळे आता परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाईन पद्धतीनच होणार आहेत.