स्वाती नाईक, झी 24 तास, नवी मुंबई : पालकांवर फी घेण्याची सक्ती करू नये असं राज्य शासनाकडून सांगण्यात येत असलं तरी बहुतांश शाळा फीसाठी पालकांच्या मागे तगादा लावत आहेत. यासाठी मुलांना ऑन लाईन वर्गातून बाहेर काढलं जात आहे. सानपाडा इथल्या रेयान इंटरनॅशनल शाळेत तर चक्क वकिलांमार्फत पालकांना फी भरण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
सानपाडा इथल्या रेयान इंटरनॅशनल शाळेच्या कारभारामुळे पालक वर्गात संतापाचं वातावरण आहे. कोविड काळात नोकरी गेलेल्या पालकांच्या मुलांना शाळेची फी भरणं अशक्य आहे. त्यातत शाळा ट्युशन फी न घेता सरसकट फी घेत असल्याने पालकांना भरमसाठ फी भरणं कठीण झालं आहे. अशात शाळेनकडून पालकांना नोटीस पाठवल्याने पालकवर्ग चिंतेत आहेत. काहींना पोस्टाने तर काहींना ऑन लाईन नोटीस पाठवली असून, सात दिवसात फी न भरल्यास शाळा सोडल्याचा दाखला, तसंच मुलांना ऑन लाईन वर्गात न घेणं हा प्रकार शाळेकडून केला जात आहे.
दरम्यान, याबाबत पालिका आयुक्तांनी दखल घेत अशा शाळांची मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालकाकडे केली असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. याबाबत शाळा प्रशासनाने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.