Ajit Pawar Group : अजित पवारांचं गुलाबी वादळ कोकणात धडकलंय...रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरीतील चिपळूण इथं राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचे कार्यक्रम झालेत. कोकणात अजित पवार गटात फुट पडल्याचे दिसत आहे. दापोली नगरपरिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. महायुतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दापोली नगरपरिषदेतील आठ पैकी सात नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केला आहे. उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वेगळा गट स्थापन केलेले नगरसेवक लवकरच राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत.
बारामतीसह अजितदादांचे सर्व उमेदवार पराभूत होत असताना कोकणात सुनील तटकरे यांनी रायगडची जागा राखली. त्यामुळे आधी मविआसह महायुतीच्या सरकारमध्ये तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांना आमदारकीच्या पहिल्याच काळात मंत्रीपदाची संधी मिळाली. आदिती यांच्या श्रीवर्धन मतदारसंघातून अजित पवार यांनी आपल्या कोकण दौऱ्याची सुरुवात केली. अनेक विकासकामांसाठी भरघोस निधी देण्याची घोषणाही त्यांनी केलीय.
कोकणात राष्ट्रवादीचे अवघे दोनच आमदार आहेत. श्रीवर्धनमधून आदिती तटकरे आणि दुसरे चिपळूणचे शेखर नाईक. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा शिंदे गटाच्या कर्जत मतदारसंघावर डोळा आहे. परंतु शिवसेना हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडेल अशी चिन्हं दिसत नाहीत. या मतदारसंघावरून दोन्ही पक्षात सध्या जोरदार वाक्युद्ध सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपात कोकणात आणखी एखादी जागा पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न दिसतोय. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राग शांत करून त्यांना आपलेसे केलेले सुनील तटकरे यांनी आता शिवसेनेशी पंगा घेतलाय. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे विजयी झाले असले तरी हक्काचा मुस्लिम मतदार त्यांच्यापासून दुरावलाय . त्यामुळे अलीकडे केलेल्या वक्तव्यावरून नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांचा थेट निषेध करण्याचे धाडस तटकरे आणि अजित पवार यांनी दाखवलंय.