भाजपने प्रवेश नाकारल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांचे तळ्यात मळ्यात

 काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप प्रवेश नाकारल्याने त्यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

Updated: Sep 14, 2019, 12:15 PM IST
भाजपने प्रवेश नाकारल्याने काँग्रेसच्या दोन आमदारांचे तळ्यात मळ्यात

मुंबई : पक्षांतर करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसच्या दोन आमदारांना भाजप प्रवेश नाकारल्याने या दोन आमदारांची स्थिती ना तळ्यात ना मळ्यात, अशी झाली आहे. 

अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे आणि पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके अशी या दोन आमदारांची नावं आहेत. या दोघांना प्रवेश नाकारल्याने भाजपने मेगाभरती बंद केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

अक्कलकोटमध्ये स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना नाराज न करण्याचे धोरण भाजप श्रेष्ठींनी घेतले आहे. तर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांना भाजपमध्ये घेतल्यानंतर परिचारक गटाची नाराजी ओढवून न घेण्याची नीती अवलंबत भाजप नेत्यांनाही त्यांचाही प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे या दोन्ही आमदारांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.