जळगाव : भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, तसेच भाजपा आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांचे अमळनेर येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. उदय वाघ यांच्या अचानक जाण्याने जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची युवाफळी पोरकी झाल्याची भावना कार्यकर्त्यांची आहे. तसेच आमदार स्मिता वाघ आणि वाघ कुटुंबीय, भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का आहे.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ हे सकाळी आंघोळ करत होते. 20 मिनिटं झाली तरी ते बाहेर येत नव्हते. उदय वाघ यांची मुलगी भैरवी सासरी जाणार होती. भैरवी यांनी त्यांना निरोप देण्यासाठी आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद आला नाही.
यानंतर शंका आल्याने अखेर बाथरूमचा दरवाजा फोडून त्यांना बाहेर काढण्यात आले. उदय वाघ यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांचं या आधीच निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
अखिल विद्यार्थी परिषदेपासून उदय वाघ यांचं सामाजिक कार्य सुरू होतं. यानंतर त्यांनी भाजपा वाढवण्यासाठी मोठं योगदान दिलं. उदय वाघ हे जिल्हाध्यक्ष असताना, भाजपाला जिल्ह्यात घवघवीत यश मिळालं.
उदय वाघ यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली आहे. उदय वाघ यांच्यामागे आमदार स्मिता वाघ, 2 मुली आणि जावई असा परिवार आहे.