आदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा

Ashish Shelar Black and White: महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केली असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसंच सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असंही ते म्हणाले आहे. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत घेणं हा कृष्णनितीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 18, 2023, 05:59 PM IST
आदित्य ठाकरेंमुळेच 2014 मध्ये शिवसेना-भाजपा युतीत मिठाचा खडा; आशिष शेलारांचा मोठा खुलासा title=

Ashish Shelar Black and White: महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेने केली असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसंच सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असंही ते म्हणाले आहे. याशिवाय अजित पवार (Ajit Pawar) यांना सत्तेत घेणं हा कृष्णनितीचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 'झी 24 तास'च्या 'Black and White' या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्य संपादक निलेश खरे यांनी आशिष शेलार यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखडपणे आपली मतं मांडली.

"महाराष्ट्रात सध्या परंपरागत पद्दतीने राजकारण सुरु नाही. वर्षानुवर्षं पाहत आहोत त्या पद्दतीने राजकीय समीकरणं, गणितं दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही सुरु आहे त्याची सुरुवात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केली. मतं घ्याची एकासह, सरकार दुसऱ्यासह स्थापन करायचं. वडिलांच्या हिंदुत्ववादी भूमिका मांडायच्याआणि सरकार बनवताना तिंलाजली द्यायची," अशी टीका आशिष शेलार यांनी केली. ज्याला निती आहे त्याला नितीने आणि अनितीशी अनितीने लढू असं सांगताना त्यांनी सध्याचं राजकारण परिस्थितीला अनुसरून योग्य आहे असं म्हटलं. 

"आम्ही वेळोवळी हिंदुत्त्वाच्या भावनेने आणि बाळासाहेबांच्या आदरापोटी शिवसेनेचे मुद्दे खोडून न काढता सत्य मांडण्यात मागे राहिलो. 151 प्लस ही घोषणा युवराजांनी भाजपाशी चर्चा न करता केली होती. तुम्ही कसपटासमान आहात, तुमच्याशी काय बोलायचं असं दाखवण्याचा प्रयत्न होत. 151 प्लस मधूनच याची बीजं सुरु होतात. उद्धव ठाकरेंनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या पुत्राचा अताताईपणा आणि दुराग्रह यातून 2014 मध्ये मिठाचा खडा पडला," असा आरोप आशिष शेलार यांनी केला. 

"आम्ही कोणाचेही शत्रू नाही. आम्ही विरोधक आहोत. आपण दोघे एकत्र असताना दुसरा पक्ष आहे हे आधी समजा, त्याच्या नेत्यांना मान द्या. हा एक राष्ट्रीय पक्ष असून, आमच्या आग्रहाकडे लक्ष द्या हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्रीपद मागणारे महापालिकेत आमची संख्या कमी असताना साधं स्थायी समिती अध्यपक्षद देण्यास तयार नव्हते. दुतोंडी न्यायाची उद्धवजींची भूमिका आम्हाला खुपत होती. पण ते इतके टोकाला जातील असं वाटलं नव्हतं," असं आशिष शेलार यांनी सांगितलं. 

"सध्या जे सुरु आहे तो थयथयाट आहे. कधी कलंक, फडतूस म्हणायचं. सरकार गेल्याचा हा थयथयाट आहे. हे त्यांच्या चेहऱ्यावर आणि वागण्यात दिसतं. लोकांचं मनोरंजन होत असेल पण स्वत:च्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी विकासाची आशा असेल. सरकारचं काम पाहिलं तर सध्याच्या सरकारची बाजू भक्कम आहे," असं ते म्हणाले. 

"25 वर्ष आमची युती होती. आम्ही कधीच युतीत सडलो असं म्हटलं नव्हतं. बाळासाहेबांकडून  मिळालेलं प्रेम हे आमचा सन्मान, मान राज्याच्या, देशाच्या हिताचा होता. अटलजी, अडवाणीजी, गोपीनाथजी यांचे प्रयत्न महाराष्ट्रहिताचे आणि देशहिताचे होते याचाही अभिमान आहे. त्यामुळे आम्ही सडलो म्हटलं नाही. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात असल्याने त्यांच्यासह युती झाली. अजित पवारांसह आमची राजकीय युती आहे, काही वर्षांनी ती भावनात्मक होऊ शकते असं फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं आहे," असं त्यांनी सांगितलं.  

दरम्यान सध्याच्या राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितलं. "लोकांमध्ये संभ्रमावस्था होणं स्वाभाविक आहे. येणाऱ्या राजकारणात आणि निवडणुकीत महाराष्ट्रातून आम्हाला 45 खासदारांचं बळ द्यायचं आहे. समान नागरी कायदा,  पाकव्याप्त काश्मीर घेण्यासाठी निती आखणं काळाजी गरज आहे. मतदारांना ते आगामी काळात दिसेलही. जगातील भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी, गरिबी दू करण्यासाठी ज्या गोष्टी करणं आलश्यक असतं ते राजकीय खेळीनेच शक्य असतं. या कृष्णनितीचा वापर करत समाजाचं देशाचं मोठं हित करण्याच्या बाजूने आहोत. रामालाही रावणाचा वध करताना रावणाच्या बंधूचा वापर करुन घ्यावा लागला होता". 

"सर्व पक्षांना काँग्रेसी चष्म्यातून पाहू नये. प्रत्येक पक्षाला वेगळ्या चष्म्यातून पाहिलं पाहिजे. भाजपातील अनेक कार्यकर्त्यांना फक्त पक्षाची सेवा करायची आहे. माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जे मिळालं आहे त्यातच आनंद आहे." असं त्यांनी सांगितलं. 

'India' चा अर्थ भारत समजू नका

"विरोधकांचा INDIA म्हणजे मीपणा आणि माझं कुटुंब असा अर्थ आहे. कुटुंबवाद आणि आपलं हित याच्या पुढे ते जाऊ शकत नाहीत. हे कोणत्याही विचाराने नाही तर मोदी नकोत म्हणून एकत्र आले आहेत. एकटे जिंकू शकत नाहीत म्हणून हे दुर्बळ एकत्र आले आहेत. भ्रष्टाचाराची कट्टर युती असं मोदींनीच म्हटलं आहे. त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर मोदींचं पारडं जड असेल," असा विश्वास आशिष शेलारांनी व्यक्त केला.