'बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे' देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या, म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील

Updated: Oct 25, 2021, 03:04 PM IST
'बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्राचा हात आहे' देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

नांदेड : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नांदेडमध्ये देगलूर विधानसभा पोट निवडणूकीसाठी (Deglur-Biloli by-election) भाजप उमेदवार सुभाष साबणे (Subhash Sabne) यांच्या प्रचारासाठी नांदेडमध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस यांची कुंडलवाडी इथं जाहीर प्रचार सभा झाली. या सभेत बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

जलयुक्त शिवार योजना बंद, रस्त्याकरता केलेली कामं बंद, धरणांची काम बंद, वीज बंद, शेतकऱ्यांना अनुदान बंद, या सरकारने केलं फक्त बंद, बंद, 2 वर्षात सरकारने केवळ भ्रष्टाचार केला अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. मिळेल त्यात भ्रष्टाचार केला असून भ्रष्टाचाराच्या सीमा या सरकारने तोडल्या आहेत. भ्रष्टाचाराचा हिशोब फक्त कॉम्प्युटरमध्ये ठेवला आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.

फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवायचं

2 वेळा अतिवृष्टी झाली, पण अजूनही शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही, शेतविम्याचे पैसे दिलेले नाहीत. काही झालं की फक्त केंद सरकारकडे बोट दाखवायचं. यांना बायकोने मारलं तरी म्हणतील केंद्र सरकारचा हात आहे, अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

शान शौक करण्यासाठी यांच्याकडे पैसे

विमा कंपन्यांनी धक्कादायक सत्य समोर आणलं, राज्य सरकारने विम्याचे पैसेच भरलेले नाहीत, शान शौक करण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत, पण पिकविम्याचा हफ्ता भरण्यासाठी पैसे नाहीत, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांनाही परवानगी द्या

एका मंत्र्याचा जावई गांजाची तस्करी करताना सापडला, मंत्री म्हणतो हा हर्बल तंबाखू आहे, असं असेल तर शेतकऱ्यांनाही हर्बल तंबाखू लावायची परवानगी द्या, म्हणजे शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील अशी खोचक टीका फडणवीस यानी केली आहे. 

हे सरकार धनदांडग्यांचं सरकार

या सरकारने विजेचं कनेक्शन कापणं सुरु केलं आहे, 4 शेतकऱ्यांनी बिल भरलं नाही तर संपूर्ण गावाची वीज कापतात, एकदा निवडणूक झाली की या भागातील वीज कनेक्शनही कापतील. हे सरकार धनदांडग्यांचं सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण काढण्याचं काम या सरकारच्या काळात झालं, अशोर रावांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. हे केवळ पैसे फेक तमाशा देख, पैसेवाल्यांचं सरकार आहे, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.