अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी (69) (Dilip Gandhi)यांचे दिल्लीत उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांचे निधन झाले. ते कोरोनाबाधित होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने तात्काळ दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते (Ahmednagar BJP former MP Dilip Gandhi Died of COVID in New Delhi)
दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते. सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यांतर त्यांची पालिका नेता म्हणून निवड झाली. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते.
2009 मध्ये दिलीप गांधी पुन्हा अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पुन्हा निवडून आले होते. त्यानंतरच्या 2019च्या निवडणुकीत दिलीप गांधी यांना उमेदवारी न देता काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले सुजय विखे यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधी यांची भेट घेऊन मनोमीलन केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, सुजय विखे यांनी लोकसभेची जागा भाजपकडे राखण्यात यश मिळवले.