ED summons Sonia and Rahul Gandhi : देशात हुकूमशाही आणि एकाधिकारशाही वाढवणाऱ्या भाजप सरकारने सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिलेली ईडीची (ED) नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी असून संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन सोनिया गांधी यांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केलं आहे.
केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना नामोहरम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे . देशात जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करून लोकशाहीवर आघात त्यांनी सुरू केला आहे असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिलेली ईडीची नोटीस अत्यंत दुर्देवी असून लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजपा सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहे. हे देशाच्या दृष्टीने चांगले नाही असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी संपूर्ण संपूर्ण देशातील जनता आणि काँग्रेसजन हे सोनिया गांधी यांच्या पाठीशी खंबीर उभी असून भाजपच्या या चुकीच्या दडपशाहीमुळे देशातील जनतेमध्ये प्रचंड रोष आणि असंतोष निर्माण झाले असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.