रविंद्र कांबळे, झी मीडिया, सागंली : एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद(Maharashtra Karnataka Border disput) पेटला असतानाच शिंदे - फडणवीस सरकारमध्ये(Shinde - Fadnavis Government) देखील वादाची ठिणगी पडली आहे. जतच्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजने बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी शिंदे - फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.
जतच्या वंचित 65 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 1900 कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा केली. तसेच जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत मध्ये पत्रकार बैठकीत केली आहे. अशी टीका करत भाजपच्या माजी आमदाराने थेट शिंदे - फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे. या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी , प्रशासकीय मंजुरी , त्याचे बजेट आणि अजूनही कॅबिनेट समोर विषय आलेला नाही. अस ही जगताप यांनी यावेळी सांगितले.
सह्याद्री वर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक ही म्हैसाळ योजनेसाठी नव्हतीच , जत तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांना गती देण्यासाठी होती. या कामासाठी 200 कोटी रुपये त्यांनी दिले आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे . परंतु विस्तारित योजनेबाबत केलेले वक्तव्य साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहे.
कारण, या योजनेला अद्याप कसलीही तांत्रिक मंजुरी , प्रशासकीय मंजुरी , त्याचे बजेट आणि अजूनही कॅबिनेट समोर विषय आलेला नाही . शिवाय कालच्या बैठकीला ज्यांच्याकडे जलसंपदा विभागाचे खाते आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित नव्हते.
जलसंपदा खात्याचे सचिव, अधिकारी देखील उपस्थित नव्हते. कर्नाटकने जत वर केलेल्या दाव्यानंतर येथील जनतेचा संभ्रम दूर व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी कदाचित हे वक्तव्य केले असावे . जोपर्यंत विस्तारित योजनेसाठी काँक्रीट असा निर्णय होत नाही. तोवर आम्ही विश्वास ठेवणार नाही. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने जत म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी स्वतंत्र बैठक घ्यावी. या बैठकीला तालुक्यातील सर्वपक्षीय नेते , पाणी योजनांचे जाणव अभ्यासक व ज्यांनी संघर्ष केला अशा सर्वांना बोलावून ठोस कृतिशील कार्यक्रम जाहीर करावा अशी आमची मागणी असल्याचे जगताप म्हणाले.