'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून भाजपचे आंदोलन

विधिमंडळात भाजप आमदार आज 'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून दिसले. 

Updated: Dec 16, 2019, 10:24 AM IST
'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून भाजपचे आंदोलन  title=

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्या दिवशीपासूनच सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजप करताना दिसत आहे. 'मी सावरकर नाही, मी माफी मागणार नाही' असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. याचा भाजपने देशभरात निषेध नोंदवला. महाराष्ट्राच्या राजकारणातही याचे पडसाद पहायला मिळत आहेत. विधिमंडळात भाजप आमदार आज 'मी पण सावरकर'च्या टोप्या घालून दिसले. 

राहुल गांधींनी हे सांगून बरं केलं की ते सावरकर नाहीत. पण या देशातील प्रत्येकाला स्वत:चे नाव सावरकरांसोबत जोडून घेतल तर ते भाग्य असेल. काँग्रेस वाल्यांना स्वत:चं नाव सावरकरांसोबत जोडून घ्यायला लाज वाटत असेल तर आम्हाला 'मी पण सावरकर' लिहीलेल्या टोप्या घालताना अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया भाजप आमदारांनी 'झी २४ तास'कडे दिली.

काय आहे प्रकरण ?

एखादी सत्य गोष्ट बोलण्यासाठी मी किंवा काँग्रेसचा कोणताही नेता माफी मागणार नाही. तसे करायला मी काही राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे. माझ्याऐवजी भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अमित शहा यांनी देशाची माफी मागायला पाहिजे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. ते शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर 'भारत बचाव' आंदोलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे नेते प्रचंड आक्रमक झाले.

विधान निंदनीय 

देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा ट्विट करून राहुल गांधी यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांचे हे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाहीत. त्यांनी स्वत:ला गांधी समजण्याची घोडचूक अजिबात करू नये. केवळ गांधी आडनाव असल्याने कुणी 'गांधी' होत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले.