ओम देशमुख, झी मीडिया
Vasai-Virar News: विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता बहुजन विकास आघाडीला महापालिकेतही भाजप धक्का देण्याच्या तयारीत आहे. विधानसभेच्या पाठोपाठ वसई विरारकडे भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. येत्या काही काळात बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यादृष्टीने भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा आहे.
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचे वर्षानुवर्ष वर्चस्व आहे. आता हेच वर्चस्व संपुष्टात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनं बविआचे नेते आणि कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. यात 50 हून अधिक माजी नगरसेवकांचाही समावेश आहे. हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्यासह त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांचा पराभव झाला आहे. विरारमधील तिन्ही जागा हातातून गेल्यानंतर भाजपाने आता वसई-विरार महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी रणनिती आखली आहे. भाजपने वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. पुढील काही महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे. नागरिकांमध्ये संपर्क जोडण्याचे काम करण्यासाठी लोकांमध्ये जा असा सल्ला वरिष्ठांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच वसई विरारमधील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश झाले होते. भाजप प्रदेश कार्यालयात रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थिती हे पक्षप्रवेश झाले होते. गणेश भुरकंड, जयेश कदम यांच्यासह वसईतील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.